पुणे – मार्केट यार्डात मागणी वाढल्यामुळे पालक, कोथिंबिर, चुका आणि मुळाच्या भावात वाढ झाली. पालकच्या भावात घाऊक बाजारात जुडीमागे 7 रुपये, कोथिंबिर आणि चुकाच्या भावात प्रत्येकी 3 रुपये, मुळाच्या भावात 2 रुपये वाढ झाली. तर, आवकच्या तुलनेत मागणी घटल्यामुळे कांदापात आणि मेथीच्या भावात जुडीमागे अनुक्रमे 7 आणि 4 रुपये घट झाली.
मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिली.
येथील बाजारात रविवारी दीड लाख जुडी कोथिंबिरीची आवक झाली. जी गेल्या आठवड्यात दोन लाख जुडी होती. घटलेली आवक आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आखणाऱ्या पार्ट्यांच्या बेतामुळे घरगुती आणि हॉटेल व्यावसायिकांकडून कोथिंबिरीची मागणी वाढली आहे.
त्यामुळे कोथिंबिरीचे भाव वाढले आहेत. तर, दुसरीकडे आवक वाढल्याने मेथीचे भाव घटले आहेत. गेल्या आठवड्यात मेथीची 50 ते 60 हजार जुडी आवक झाली होती. जी आज 70 हजार झाली.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी)
कोथिंबीर : 200-800, मेथी : 100-300, शेपू : 200-400, कांदापात : 1000-1500, चाकवत : 400-500, करडई : 400-500, पुदिना : 200-300, अंबाडी : 500-600, मुळे : 800-1200, राजगिरा : 400-500, चुका : 700-800, चवळई : 400-600, पालक : 800-1200, हरभरा गड्डी : 400-700 रुपये.