पुणे – पुणे-सातारा महामार्गावर मोटारचालकाला धमकावून 49 लाखांची लूट प्रकरणातील फरार आरोपीला दत्तवाडी पोलिसांनी सहा वर्षांनंतर अटक केले. गणेश दत्तोबा नेवसे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गावर 2014 मध्ये मोटारचालकाला धमकावून 49 लाखांची रोकड लुटण्यात आली होती. या गुन्ह्यात काही आरोपींना अटक करण्यात आले होते. मात्र, गुन्ह्यात सहभागी झालेला आरोपी नेवसे पसार होता. तो कात्रज, धायरी, पर्वती भागात राहत होता. पोलिसांकडून त्याचा माग काढण्यात येत होता. मात्र, तो वेगवेगळ्या भागात राहत असल्याने पोलिसांना आढळून येत नव्हता.
दरम्यान, टिळक रस्त्यावरील एका गल्लीत नेवसे थांबल्याची माहिती पोलीस हवालदार कुंदन शिंदे आणि सागर सुतकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केले.
ही कामगिरी दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील लोहार, सुधीर घोटकुले, महेश गाढवे, अमित सुर्वे, नवनाथ भोसले, शिवाजी क्षीरसागर, विष्णू सुतार, राहुल ओलेकर यांनी केली.
6 वर्षे गुंगारा –
गणेश नेवसे याने त्याच्या आठ साथीदारांच्या मदतीने राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपचालकाची रोकड लुटली होती. यावेळी रोकड घेऊन जाणाऱ्यावर हल्लाही करण्यात आला होता.
गुन्ह्यातील इतर आरोपी घटनेनंतर सापडले होते. मात्र, गणेश हा तब्बल सहा वर्षे सातत्याने पत्ता बदलत गुंगारा देत होता. त्याच्याविरुद्ध चेक बाउन्स आणि स.प.महाविद्यालयाचे कॅन्टिनची तोडफोड केल्याचा गुन्हा दाखल आहे.