शिरवळ (प्रतिनिधी) – वडगाव (पोतनीस) ता. खंडाळा येथील शेतमजुराने मालकाच्या शेतामधील शेळ्यांसह शेतातील सुमारे 83 हजार 500 रुपयांचे विविध साहित्य चोरल्याप्रकरणी संशयित शेतमजूर पिंटू फुलसिंग चव्हाण (रा. कलमल्ली तांडा, कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, वडगाव (पोतनीस) याठिकाणी लिंब ता. सातारा येथील आप्पासाहेब विष्णू सावंत यांच्या मालकीची साडेचार एकर जमीन आहे. येथे विविध प्रकारची झाडे लावली असून शेतामधील जमिनीची मशागत करण्याकरिता कर्नाटक राज्यातील पिंटू चव्हाण यास कुटुंबीयांसमवेत पगारावर ठेवले आहे.
दरम्यान ,आप्पासाहेब सावंत 19 डिसेंबर रोजी वडगाव (पोतनीस) याठिकाणी आले असता त्याठिकाणी पिंटू चव्हाण शेतामध्ये कुटुंबीयांसमवेत नसल्याचे सावंत यांच्या लक्षात आले. त्यांनी शोधाशोध केली. परंतु, पिंटू चव्हाण कुटुंबीयांसमवेत सापडला नाही.
सावंत यांनी शेतामधील घराची पाहणी केली असता पिंटूने शेतामधील अन्नधान्यासह शेळ्या, कोंबड्या, नारळ असा मिळून सुमारे 83 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे निदर्शनास आले. आप्पासाहेब सावंत यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद स्टेशनला दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे करीत आहेत.