देशी बनावटीच्या पिस्टलसह चार काडतुसे जप्त; तिघांना अटक

शिरवळ येथे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सातारा (प्रतिनिधी) – शिरवळ (ता. खंडाळा) येथील पंढरपूर फाट्याजवळ बेकायदा पिस्टल विक्री करण्यासाठी आलेल्या पुणे येथील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल, चार जिवंत काडतुसे, दोन मोबाइल व ऍक्‍टिव्हा मोपेड असा एक लाख 15 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने जिल्हयात बेकायदेशीर शस्त्र बाळणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाईच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर थुमाळ यांना दिल्या आहेत.

त्या अनुषंगाने धुमाळ यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार केले आहे. धुमाळ यांना दि. 21 डिसेंबर रोजी पंढरपूर फाटा येथे बेकायदा पिस्टल विक्री करण्याकरीता दोन व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रमेश गर्जे व त्यांच्या पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले. गर्जे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंढरपूर फाटा सापळा लावला.

दोन व्यक्ती ऍक्‍टिव्हा मोपेडवरून (एमएच 12 केबी 8323) त्याठिकाणी आले. पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली. त्यांच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्टल, चार जिवंत काडतुसे, दोन मोबाइल हॅन्डसेट, ऍक्‍टिव्हा मोपेड असा एकूण एक लाख 15 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या गुन्ह्यात जावेद सुलतान शेख (वय 37), अमोल पाखरे (रा. अशोकनगर येरवडा पुणे), इरफान हुसेन शेख(वय 35, रा. कोंढवा पुणे) यांच्याविरुध्द शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तिन्ही संशयितांपैकी दोघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दि. 24 डिसेंबरपर्यंत कोठडी देण्यात आली. तिसरा संशयित फरारी आहे.

पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनेनुसार पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, सहायक फौजदार जोतीराम बर्गे, हवालदार कांतीलाल नवघणे, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पोलिस नाईक शरद बेबले, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, निलेश काटकर, रोहित निकम, सचिन ससाणे, पंकज बेसके, विजय सावंत यांनी ही कारवाई केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.