वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल रद्द करा, अशी मागणी करीत डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी त्यात प्रामुख्याने पेनसिल्वेनिया प्रांतातील निकालाबद्दल आणि त्यावर तेथील कोर्टाने दिलेल्या निकालाबद्दल आव्हान दिले आहे.
या प्रांताच्या जनरल असेंब्लीला त्यांचे सदस्य निवडण्याचा अधिकार द्या, अशी मागणी त्यांनी त्यात केली आहे. तथापि त्यांच्या या अर्जाचा सुप्रीम कोर्टाकडून विचार होण्याची शक्यता नाही, असे विधीतज्ज्ञांचे मत आहे. त्या उलट बायडेन समर्थकांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांच्या अर्जानुसार पेनसिल्वेनिया प्रांताचा निकाल जरी रद्द झाला तरी बायडेन यांच्या विजयावर त्याने काही फरक पडणार नाही.
या प्रांताची मते सोडून दिली तरी बायडेन यांना ट्रम्प यांच्यापेक्षा जास्तच मते आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्या या प्रयत्नाला आम्ही फार महत्त्व देत नाही असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. येत्या 6 जानेवारीला मतांची टॅली करण्यासाठी अमेरिकन कॉंग्रेसची बैठक होत आहे. त्यापूर्वी आपल्या याचिकेचा निकाल दिला जावा, अशी मागणीही ट्रम्प यांनी केली आहे.
त्याचाही विचार होण्याची शक्यता नाही. कारण सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी 8 जानेवारीपर्यंत कोणत्याच याचिकांची सुनावणी न घेण्याचा निर्णय या आधीच जाहीर केला आहे. मतांची जी अंतिम टॅली जाहीर झाली आहे, त्यानुसार बायडेन यांना 306 तर ट्रम्प यांना 232 मते पडली आहेत. पेन्सिलव्हानिया प्रांताची इलेक्ट्रॉल कॉलेजची 20 मते बायडेन यांना पडल्याचे तेथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या आधीच घोषित केले असून तसे सर्टिफिकेटही त्यांनी बायडेन यांना दिले आहे.