बॅंक ऑफ बडोदाचा संरक्षण दलांशी सामंजस्य करार

बडोदा मिलिटरी सॅलरी पॅकेजमधून नेटवर्कद्वारे बॅंकिंग सेवा

नवी दिल्ली – बॅंक ऑफ बडोदाने बडोदा मिलिटरी सॅलरी पॅकेजच्या माध्यमातून भारतीय नौदल व भारतीय तटरक्षक दल यांना विशेष बॅंकिंग सुविधा देण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
तसेच भारतीय लष्कराबरोबर असलेल्या विद्यमान सामंजस्य कराराचे नूतनीकरण केले.

बॅंकेने भारतीय हवाई दलाबरोबर अशी व्यवस्था केलेली आहे. बडोदा मिलिटरी सॅलरी पॅकेजअंतर्गत, भारतीय सशस्त्र दलातील सेवा बजावणाऱ्या आणि सेवानिवृत्त झालेल्या जवानांना बॅंकेच्या 8,200 हून अधिक देशांतर्गत शाखा व 20 हजारांहून अधिक टच पॉईंट्‌स या नेटवर्कद्वारे सेवा पुरविण्यात येतील.
या पॅकेजमध्ये विनामूल्य वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण, कायमस्वरुपी अपंगत्व संरक्षण, अंशतः अपंगत्व संरक्षण, हवाई अपघात विम्याचे मोठ्या रकमेचे संरक्षण, तसेच सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या मृत्यूनंतर मुलांसाठी उच्च शिक्षणासाठीची तरतूद व मुलींसाठी विवाह खर्चाची तरतूद अशा आकर्षक लाभांचा समावेश आहे.

इतर सर्व बॅंकांच्या एटीएममध्ये अमर्यादित व नि:शुल्क एटीएम व्यवहार, किरकोळ कर्जांवरील विविध सेवा शुल्कात माफी वा सवलत, आरटीजीएस/एनईएफटीमार्फत पैसे पाठवण्याची मोफत सुविधा, मोफत डिमांड ड्राफ्ट/बॅंकर चेक, लॉकर भाड्यात मोठी सवलत, डिमॅट खात्यावरील मेन्टेनन्स शुल्कावर माफी आणि डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड वापरातील विविध अतिरिक्त फायदे अशा सुविधांचा यात समावेश आहे.

बॅंकेचे कार्यकारी संचालक विक्रमादित्य सिंग खिची म्हणाले, बडोदा मिलिटरी सॅलरी पॅकेजअंतर्गत असणाऱी अंगभूत वैशिष्ट्‌ये व सुविधा यांमुळे, बॅंकिंग उद्योगात उपलब्ध असलेल्या वेतन व निवृत्तीवेतन योजनांमध्ये हे पॅकेज सर्वोत्तम ठरते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.