- चर्चबाहेर आकर्षक रोषणाई
- विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी – ख्रिसमसच्या सेलिब्रेशनला अवघे चार दिवस राहिल्याने पिंपरी कॅम्पातील दुकाने सजावटीच्या साहित्याने सजली आहेत. तर उपनगरातील बेकऱ्या, केक शॉप विविध फ्लेवर्सच्या कुकीज, पेस्ट्रीज आणि चॉकलेट्सने सजल्या आहेत. चर्चच्या बाहेर केलेली रोषणाई, सजवलेले ख्रिसमस ट्री सगळ्यांचे आकर्षण ठरत आहेत.
ख्रिसमस हा सण ख्रिस्ती बांधवांचा असला, तरी सर्वधर्मीय उत्साहाने हा सण साजरा करतात. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच ‘ख्रिसमस ट्री’ पासून ते सांताक्लॉज, येशू जन्माचा देखावा आणि चर्चेतील रोषणाईबद्दल कुतूहल असते. ख्रिसमसला अवघे चार दिवस राहिल्याने कॅम्प परिसरातील वातावरण सध्या बदलले आहे. रंगीबेरंगी चांदण्या, बेल्स, पताकांनी सजविलेली दुकाने, ख्रिसमस ट्रीवर लुकलुकणारे दिवे, सांताक्लॉजचा पेहेराव आकर्षण ठरत आहे. दिव्यांच्या माळा आणि चांदण्यांनी दुकाने सजविली आहेत. येथील बाजारपेठांमध्ये ख्रिसमस ट्री सजविण्याचे अनेकविध प्रकार उपलब्ध असून, नागरिकांनी रविवारी सुट्टीचा मुहूर्त साधून पिंपरी कॅम्प परिसरात खरेदीसाठी गर्दी केली होती.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सण मर्यादित स्वरुपात साजरे करण्याचे आदेश असल्याने ख्रिस्त बांधव घरातील ख्रिसमस ट्री सजविण्याच्या खरेदीत व्यग्र आहेत. तर चर्चमध्ये सजावटीचा शेवटचा हात फिरवला जात आहे. तर चर्चवर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. ख्रिसमसच्या जोडून सुट्ट्या आल्याने अनेकांनी सहलीचे नियोजन केले आहे. ख्रिसमस आणि केक हे समीकरणच असल्याने शहरात नामवंत बेकऱ्यांमध्ये केकचे विविध प्रकार दाखल झाले आहेत.
चर्चमध्ये धार्मिक उत्सवाचे मर्यादित स्वरुपात नियोजन
पिंपरीतील अवरलेडी कन्सोलर चर्चमध्ये ख्रिमसमच्या पूर्वसंध्येला गुरुवारी (दि.24) सायंकाळी सात रात्री नऊ या वेळेत विभागवार वॉच नाइटची उपासना केली जाणार आहे. ख्रिसमसच्या दिवशी सकाळ मिस्सा कार्यकम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती फादर अमृत फन्सेका यांनी दिली. याशिवाय कामगारनगरमधील दि युनायटेड ख्राईस्ट चर्चमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन ख्रिसमस साजरा केला जाणार आहे, अशी माहिती पास्टर सुधीर पारकर यांनी दिली. तसेच पिंपरीगावातील हिंदुस्तानी कॉन्व्हेंट चर्चमध्येदेखील धार्मिक कार्यक्रमाचे मर्यादित ख्रिस्ती बांधवांच्या उपस्थितीत नियोजन केले असल्याची माहिती पास्टर येशुदास कालेकर यांनी दिली.