साधारणपणे आपल्या देशात 12 आकड्याला अशुभ मानले जाते. त्यामुळेच त्याचे बारा वाजले, बारा वाजल्यासारखा चेहरा का झालाय असे विचारले जाते. परंतु स्विर्त्झलंडमधील सोलोथर्न शहरात असे घड्याळ आहे ज्यामध्ये बारा वाजतच नाहीत. त्यामागील कारण समजल्यावर तुम्हीदेखील आश्चर्यचकीत व्हाल. सोलथर्न शहरातील टाऊन स्क्वेअरच्या मनोऱ्यावर लावण्यात आलेल्या या घड्याळात फक्त 11 पर्यंतचे आकडे आहेत. त्यातून 12 हा आकडा गायब आहे. यासारखीच अनेक घड्याळे आहेत. ज्यामध्ये बारा वाजत नाहीत.
या शहाराचे हे वैशिष्ट्य आहे की, इथल्या लोकांना 11 हा आकडा फार आवडतो. इथल्या अनेक वस्तूंचे डिझाईन 11 आकड्याप्रमाणे दिसेल असे असते. या शहरामध्ये नेमकी 11 चर्च आहेत. त्याखेरीज 11 संग्रहालये आणि 11 टॉवर आहेत. इथल्या सेंट उर्सूस या मुख्य चर्चमध्येही तुम्हांला 11 आकड्याचे महत्त्व समजेल. हे चर्च 11 साली बांधून पूर्ण झाले होते. चर्चमध्ये तीन जिने आहेत. प्रत्येक जिन्याला 11 पायऱ्या आहेत. चर्चला 11 दरवाजे आणि 11 घंटा आहेत.
एवढेच नाही तर इथल्या कुणाचाही 11 वा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. त्यावेळी दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूही 11 आकड्याशी निगडीत असतात.
11 क्रमांकाला एवढे महत्त्व असण्यामागे प्राचीन काळापासूनच्या परंपरा आहेत. असे सांगितले जाते की, सोलोथर्नचे लोक खूप कष्ट करायचे. मात्र कष्ट करूनही त्यांच्या जीवनात समाधान नसायचे. काही वर्षांनी डोंगराळ प्रदेशातून देवदूत(एल्फ) येऊ लागले आणि लोकांचा उत्साह वाढवू लागले. देवदूत आल्यानंतर तिथल्या लोकांना आनंद आणि समाधान मिळू लागले. या देवदूतांविषयी जर्मनातील प्राचीन गोष्टींमध्ये वाचायला मिळते. असे सांगितले जाते की, यांच्याकडे अलौकिक शक्ती होती आणि जर्मन भाषेत एल्फचा अर्थ 11. तेव्हापासून इथल्या लोकांनी 11 क्रमांकाला महत्त्व द्यायला सुरुवात केली.