पुणे – दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसाने मंगळवारी विश्रांती घेतली. मंगळवारी दुपारपर्यंत काही भागात ढगाळ वातावरण होते. तर, बुधवारी आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची, तर गुरुवारपासून कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मागील 24 तासांत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. विदर्भाच्या बहुतांश भागात, मराठवाड्याच्या बऱ्याच भागात, तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली.
कोकण, गोव्याच्या बहुतांशा भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मंगळवारी महाबळेश्वर येथे 15.4 अंश सेल्सिअस इतक्या राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. बुधवारपासून गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पुणे येथे 23.6 अंश सेल्सिअस कमाल आणि 17.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर लोहगाव येथे 24.2 अंश सेल्सिअस कमाल आणि 17.8 अंश सेल्सिअस किमान तापमान, पाषाण येथे 22.5 अंश सेल्सिअस कमाल आणि 17.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंदविले आहे.