राहुरी – बारागाव नांदूर येथे वाळू तस्करांच्या दोन गटांमध्ये सोमवारी (दि. 14) रात्री नऊच्या सुमारास भर चौकात धुमश्चक्री झाली. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवाजी चौकात शंभरावर महिला-पुरुष आमने सामने उभे राहिले.
दहा-बारा जणांनी लाठ्या काठ्यांनी तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी एकमेकांना बदडून काढले. दुकाने पटापट बंद झाली. अघोषित संचारबंदी निर्माण झाली. रात्री नऊ वाजता पोलिसांची तीन वाहने गावात सायरन वाजवत फिरू लागली.
बारागाव नांदूर येथे वाळू तस्कराच्या एका गटाने नवीन वाहन घेतले. दुसऱ्या गटाने त्यावर आक्षेप घेतला. वाळू धंदा कसा करतो, आम्ही पाहतो. वाळू धंदा केला तर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करू असा पवित्रा घेतला. त्यावरुन राहुरी येथे सायंकाळी पाच वाजता एका हॉटेलमध्ये दोन्ही गटातील काही व्यक्तींमध्ये वादावादी झाली, त्याचे गावात पडसाद उमटले.
वाळू तस्करांच्या दोन्ही गटांमधील महिला सायंकाळी सात वाजता गावातील चौकात आमने-सामने उभ्या ठाकल्या. दोन्ही गटातील पुरुषही सरसावले. दहा-बारा जणांनी लाठ्या-काठ्या हाती घेतल्या. जोरदार धुमश्चक्री सुरू झाली. एरवी रात्री दहा वाजेपर्यंत चालू राहणारी दुकाने पटापट बंद झाली. अर्धा-पाऊण तास शिवीगाळ, लाथा-बुक्क्यांचा प्रहार, लाठ्या -काठ्यांचे फटके एकमेकांवर बरसले.
धुमश्चक्री संपल्यानंतर हिंदी चित्रपटासारखे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गावात संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. वाळूतस्करांची दोन्ही गट पांगले. पोलिसांच्या तीन गाड्या सायरन वाजवत फिरू लागल्या. भांडणात गाव पुढाऱ्यांनी अलिप्त राहण्याची भूमिका बजावली. आजचे वाद भविष्यातील एखाद्या मोठ्या गुन्ह्याचे कारण ठरण्याची शक्यता काही ग्रामस्थांनी व्यक्त केली.