पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच औषध विक्रेत्यांची कोविड-19 लसीकरणसाठीची नाव नोंदणी सुरु करून, औषध विक्रेत्यांना कोविड-19 ची लस मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष व काळेवाडी-रहाटणी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विवेक तापकीर यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील औषध व्यावसायिक कोविड-19 शी अविरतपणे अहोरात्र ग्राहकांना सेवा देऊन समर्थपणे लढा देत आहेत. महापालिकेकडून पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, औषध विक्रत्यांनी आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहत या लढ्यात आपला सक्रिय सहभाग नोंदिविला आहे.
औषधविक्री अत्यावश्यक सेवेत येत असून, औषध विकत घेण्याकरिता दररोज अनेक रुग्ण मेडीकलमध्ये येत असल्याने, हा घटकदेखील धोकादायक परिस्थितीत आपले कर्तव्य बजावत असताना अनेक व्यावसायिकांना करोनाची लागण झाली होती.
खासगी वैद्यकीय चिकित्सकांची कोविड-19 लसीकरणसाठी नाव नोंदणी सुरु आहे. औषध व्यावसायिकांनीदेखील कोविडच्या काळात चांगली कामगिरी केली आहे. या व्यावसायिकांची समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि कर्तव्यनिष्ठा यांचा विचार करुन या घटकाची मोफत कोविड तपासणी करण्याची मागणी तापकीर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.