मुंबई – मुंबईला “पाकव्याप्त काश्मीर’ म्हणणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला एक आयतेच कोलीत आज मिळाले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे पाकिस्तानचे क्रेडिट कार्ड आढळून आल्याने कंगनाने म्हटले आहे की, बघा भारताचा आता पाकिस्तान होऊ लागला आहे. कंगनाने मुंबईची पाकव्याप्त काश्मिरशी तुलना केल्यानंतर सरनाईकांनी तिला धमकावले होते. त्यावरुन आता कंगनाने प्रताप सरनाईकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
सध्या मनी लॉंड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरू आहे. ईडीने टाकलेल्या धाडीमध्ये सरनाईक यांच्या घरातून पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या क्रेडिट कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता आहे. त्यामुळे कंगना भलतीच खवळली आहे.
कंगनाने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये प्रताप सरनाईकांवर निशाणा साधत लिहिले आहे, “जेव्हा मी मुंबईत पीओकेसारखं वाटतं, असे म्हटले होते, तेव्हा त्यांनी माझे थोबाड फोडण्याची धमकी दिली होती. भारत त्या लोकांना ओळखतो, जे तुमच्यासाठी बलिदान देतात आणि जे तुमच्याकडून सर्व काही हिसकावूनही घेतात. तुम्ही जिथे विश्वास ठेवता तिथे तुमचे भविष्य आहे. “इंडिया पाकिस्तान ना हो जाए; सम्हालो यारों’, अशा आशयाची पोस्ट कंगनाने शेअर केली आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1337643015486267394
सरनाईकांनी कंगनाविषयी काय म्हटले होते
कंगंनाने जेव्हा मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती, तेव्हा प्रताप सरनाईक यांनीदेखील कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत तिला इशारा दिला होता. कंगना इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलिब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांकडे मागणी करणार आहे,असे सरनाईक म्हणाले होते.