कोरेगाव भीमा(प्रतिनिधी) – डिंग्रजवाडी ( ता. शिरूर ) येथील हभप किसनराव तुकाराम गव्हाणे उर्फ आप्पासाहेब हे 83 वर्षांचे आजोबा ते पणतू असा सहकुटुंब किल्लेदुर्ग दुर्गराज स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला 25 वर्षांच्या तरूणासारखा उत्साह दाखवत सर केला.
किसनराव गव्हाणे यांच्यासोबत त्यांचा मुलगा साईनाथ, सून द्वारका, नात पूजा अतुल वागस्कर, नातू साहिल साईनाथ गव्हाणे, नात सानिका साईनाथ गव्हाणे व तीन वर्षांचा पणतू शिवतेज अतुल वागस्कर हे होते. एकाच वेळी चार पिढ्यांनी एकत्र रायगडावर पायी जात छत्रपती शिवाजीमहाराजांना मानाचा मुजरा केला आहे. यामुळे गव्हाणे कुटुंबीय कोरेगाव भीमा परिसरात कौतुकाचा व चर्चेचा विषय ठरला आहे.
आजच्या पिढीत आपल्या मुलांना मॉल, सिनेमागृह, करमणुकीच्या ठिकाणी घेऊन जाणारे आजोबा व बाबांना या कुटुंबीयांनी कृतियुक्त आदर्श ठेवला आहे. भावी पिढ्यांना आपण काय द्यायला हवे, याचे जणू त्यांनी कृतियुक्त उदाहरण समोर ठेवले. किसनराव गव्हाणे यांनी पंढरीची पायी वारी करून भक्ती तर रायगड सर करून या वयातही त्यांच्या शारीरिक व मानसिक शक्तीची प्रचिती दिली.
“किसनमहाराज अप्पांनी किल्लेदुर्ग राजधानी रायगडावर चालत जाऊन छत्रपतींना अभिवादन करून तरुणांपुढे जिवंत आदर्श ठेवला आहे. या वयात किल्ला चढून विक्रमवीर ठरले. आम्हाला अप्पांच्या या कर्तृत्वाने कायम प्रेरणा मिळेल.
-दत्ता आबा गव्हाणे, माजी उपसरपंच डिंग्रजवाडी
किसनराव म्हणतात, तरुणांनी व्यसनाधीनता, वाईट विचार व वाईट संगत यांचा त्याग करावा. नित्य व्यायाम, सकस आहार घेऊन संताच्या विचारांचे व छत्रपतींच्या आदर्शांचे पालन करून जीवन सुखी करावे.
गव्हाणे यांच्या एका पायाचे दोन वेळा ऑपरेशन झालेले असूनही त्यांनी अवघड असा किल्ला रायगड पायी सर केला. 83 वय असलेले किसनराव गव्हाणे हे पंढरीचे वारकरी असून विविध हरिनाम सप्ताहांमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. त्यांना वीणेकरी किसनराव आप्पा या नावानेही ओळखतात.
“अप्पांच्या या वयातील उत्साहाने व कर्तृत्वाने आम्ही भारावून गेलो आहोत. अप्पांनी आम्हा तरुणांना प्रेरणात्मक आदर्श घालून दिला आहे.
-मल्हारी गव्हाणे, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते
त्यांच्या या विशेष कौतुकास्पद कामगिरीबाबत त्यांच्या घरी जाऊन आप्पांचा सत्कार डिंग्रजवाडीचे उपसरपंच दत्ता आबा गव्हाणे, माजी उपसरपंच संदीप गव्हाणे सामाजिक कार्यकर्ते मल्हारी गव्हाणे यांनी केला. यावेळी राहुल गव्हाणे, सतीश गव्हाणे, अमोल गव्हाणे, जिवलग मित्र व त्यांचे चिरंजीव शिवशंभूभक्त साईनाथ गव्हाणे उपस्थित होते.