गुळ-भुसार बंद, तर फळे-भाजीपाला-फूल विभाग आज सुरू

कामागारांसह सर्व संघटनांचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

पुणे – शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला पाठिंबा देत मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभागातील कामकाज बंद राहणार आहे. याबाबतची माहिती दि पूना मर्चंट्‌स चेंबरने दिली आहे. या बंदला श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन आणि अखिल पुणे फुलबाजार आडते असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. मात्र, दोन्ही बाजार सुरू राहणार असल्याचे संघटनेकडून कळविण्यात आले आहे.

दिल्लीतील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील अनेक बाजार समित्यांमधील विविध घटकांनी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यात मार्केट यार्डातील गुळ-भुसार बाजार बंद राहणार आहे. याविषयी चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल म्हणाले, “भारत बंदमध्ये आम्ही सहभागी आहोत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. बाजार समिती आवारात शेतीमाल विक्रीवर सेस आणि इतर शुल्क आकारण्यात येणार आहे. बाजार समितीच्या आवाराबाहेर मात्र कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. त्यामुळे बाजार आवारातील व्यापार संपण्याची शक्‍यता आहे. बाजार आवारही सेसमुक्त करावा,’ अशी आमची मागणी आहे.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले, “शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, बाजार सुरूच राहणार आहे. देशभरातून निघालेल्या भाजीपाल्याच्या सुमारे 80 गाड्या रस्त्यात आहेत. तो शेतकऱ्यांचाच माल आहे. तो माल उतरवून ने घेतल्यास सडण्याची शक्‍यता आहे. यातून शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. एकीकडे शेतकऱ्यांचा पाठिंबा द्यायचा. दुसरीकडे शेतकऱ्यांचा माल सडवायचा योग्य नाही. त्यामुळे बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.’

अखिल पुणे फुलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरूण वीर म्हणाले, “शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, फुले ही नाशवंत आहेत. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी बाजार सुरूच राहणार आहे.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.