कराड (प्रतिनिधी) – पाटण-कराड मार्गावर एका परदेशी युवतीने रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास धुमाकूळ घातला. पाटणमधील दुचाकी पळवून ती कराडच्या दिशेने सुसाट निघाली. दुचाकीतील पेट्रोल संपल्याने तिने नवारस्ता येथे दुचाकी सोडून तेथे एका जीपचा ताबा घेतला आणि भरधाव वेगाने कराडचा रस्ता धरला.
या मार्गावर अनेक अपघात होता होता वाचले. विजयनगरजवळ आल्यानंतर जीपने एका कारला मागून जोराची धडक दिली. या अपघातात जीप रस्त्याच्या दुभाजकाला धडकून उलटली. यात ती परदेशी युवती किरकोळ जखमी झाली आहे. ही युवती नेदरलॅंडस्ची रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत माहिती अशी, एक परदेशी युवती पाटणहून पल्सर मोटारसायकल पळवून नेऊन कराड रस्त्याने सुसाट निघाली. निसरे-नवारस्ता येथे पेट्रोल संपल्याने युवतीने तेथेच दुचाकी सोडली. त्यानंतर 50-60 फूट अंतर पळत जात असतानाच रस्त्याकडेला ज्ञानदेव नलवडे (रा. नावडी, ता. पाटण) यांची जीप तिला दिसली.
जीपला चावी तशीच असल्याचे लक्षात येताच तिने जीप सुरू केली. नलवडे यांच्या लक्षात येईपर्यंत ती जीप घेऊन वेगाने कराडच्या दिशेने निघाली. त्यावेळी रस्त्यावर गोंधळ उडाला. नवारस्ता येथे पेट्रोलिंग करणारे होमगार्ड आकाश चव्हाण व अमन गुजर यांनी दुचाकीवरून जीपचा पाठलाग केला.
रस्त्यावर वर्दळ कमी असल्याचे पाहून परदेशी युवतीने जीपचा वेग वाढवला. अनेक वाहनांना हुलकावणी देत ती जीप घेऊन निघाली. आरटीओ कार्यालयाच्या पुढे उताराला तिने जीपचा वेग आणखी वाढवला. विजयनगर येथे तिचा जीपवरील ताबा सुटला. जीपने नानासाहेब शंकर पवार (रा. नवारस्ता) यांच्या कारला पाठीमागून जोराची धडक दिली.
त्यानंतरही जीप न थांबविता पुन्हा वेगात कराडकडे निघाली. त्यावेळी जीप दुभाजकाला धडकून रस्त्यावर उलटली. या घटनेत नानासाहेब पवार व ती विदेशी युवती किरकोळ जखमी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परदेशी युवतीला ताब्यात घेतले.
ती युवती पाटणमध्ये कशी आली? दुचाकी व जीप घेऊन ती गडबडीने कोठे निघाली होती? ती भारतात कधी व कशासाठी आली, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात झाली नव्हती.