पुणे – शहरात रविवारी नव्याने 309 करोनाबाधित सापडले. मागील पंधरा दिवसांपासून बाधितांची संख्या ही तीनशे ते चारशेच्या आसपास आहे. यामुळे बाधितांची एकूण संख्या 1 लाख 72 हजार 78 वर पोहचली आहे.
सक्रीय बाधितांची संख्याही पाच हजारांवर असून, गेल्या 24 तासांत करोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात 444 बाधित करोनामुक्त झाले आहेत.
शनिवारी दिवसभरात 3 हजार 736 जणांची तपासणी करण्यात आली असून, मागील दोन दिवसांतील नमुने अहवालातून आजची बाधित संख्या समोर आली आहे. संशयितांची तात्काळ तपासणी करून उपचाराला सुरुवात व्हावी, यासाठी या चाचण्या वाढवल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
दोन आठवड्यांपूर्वी चार हजारापर्यंत खाली आलेली सक्रीय बाधितांची संख्या आता पुन्हा वाढली असून, सध्या 5,162 ऍक्टिव्ह केसेस आहेत. त्यातील 422 बाधितांची प्रकृती चिंताजनक असून, 252 बाधित व्हेंटीलेटर तर 170 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.