नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणाची मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. त्यामुळे माझ्या जीविताला धोका आहे. मला सरकारतर्फे पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी आहे. त्या संदर्भात उद्या पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे अर्ज करणार आहे, अशी माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
सोमवारी (दि. 30) रात्री पावणेआठच्या सुमारास नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात सामाजिक कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आलेली आहे. त्यावेळी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने त्यांच्या सोबत होत्या. त्यांचा जबाब बाकी असल्याचे पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी माध्यमांना सांगितले होते. त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र, त्यांचा मोबाईल बंद असल्याने वेगळ्याच शंका उपस्थित झाल्या होत्या.
दरम्यान, आज त्या संदर्भात माध्यमांनी वृत्त प्रकाशित केल्याने विजयमाला माने पोलिसांत तातडीने दाखल झाल्या आहेत. त्यांनी आज घटनेसंदर्भात पोलिसांना सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला आहे. घटनेनंतर सातत्याने फोन येत असल्याने मोबाईल बंद करुन ठेवला होता.
या घटनेचा माझ्यावर मानसिक व शारीरीक परिणाम झाला असून, रक्तातील साखरही वाढली होती. तसेच माझ्या परिवारातील सदस्यांनाही त्याबाबत भीती वाटत आहे. त्यामुळे कोणाच्याच संपर्कात नव्हते, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. मलाही भीती वाटत असल्याने पोलिसांकडे उद्याच संरक्षणाची मागणी करणार आहे. आज सुट्टीचा दिवस असल्याने अर्ज देता आलेला नाही. उद्या पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेवून तसा अर्ज देणार असल्याचेही माने यांनी सांगितले.
दरम्यान, रेखा जरे यांच्या खून कसा झाला? संशयित आरोपींनी त्यांचे वाहन कसे अडविले? कट मारल्याचा वाद कसा घातला व मला समजायच्या आत गळ्यावर चाकू कसा मारला? या संदर्भात सविस्तर माहिती माने यांनी जबाबात दिली आहे. त्यासोबतच त्या दिवशी मी माझ्या कामासाठी व जरे यांच्या वैद्यकीय कामासाठी पुण्याला गेलो होतो, अशी माहिती त्यांनी दिली.
विशेष म्हणजे जरे यांच्या हत्येनंतर माने यांनीच हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला फोनवरून घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर माने यांनीच स्वत: कार चालवत जरे यांना दवाखान्यात पोहोचविण्याचा प्रयत्न केला होता.