चंदीगड – हैदराबादस्थित भारत बायोटेकने विकसित केलेली ‘कोवॅक्सिन’ ही लस चाचण्यांच्यावेळी हरियाना सरकारचे मंत्री अनिल वीज यांनी घेतली होती. त्यानंतरही त्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ते हरियानाचे आरोग्य मंत्री आहेत. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लस घेऊनही करोनाची लागण झाल्याने लसीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यावर भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिले आहे.
भारत बायोटेकने निवेदनात म्हटले आहे की, “आमची क्लिनिकल ट्रायल ही दोन डोसवर आधारित आहे. त्यासाठी 28 दिवस द्यावे लागतात. म्हणजेच कोवॅक्सिन लसीची कार्यक्षमता ही दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी निश्चित केली जाऊ शकते.” मंत्री अनिल विज यांनी क्लिनिकल ट्रायलदरम्यान दोन आठवड्यांपूर्वी कोवॅक्सिन लसीचा एक डोस घेतला होता. त्यानंतर ते करोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.
Covaxin clinical trials are based on a 2-dose schedule, given 28 days apart. The vaccine efficacy will be determined 14 days post the 2nd dose. Covaxin has been designed to be efficacious when subjects receive both doses: Bharat Biotech https://t.co/eT5YybkoLl
— ANI (@ANI) December 5, 2020
कंपनीने असेही म्हटले आहे की, “चाचणीचा भाग म्हणून 50 ट्कके सहभागींना ही लस मिळाली तर इतरांना प्लेसबो देण्यात आला होता. फेज-3 मधील ट्रायल ही दुप्पट करण्यात आली होती. यात 50 टक्के सहभागींना लस देण्यात आली तर उर्वरितांना प्लेसबो देण्यात आला.” असे भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, जननायक जनता पार्टीचे तीन जणांचे शिष्टमंडळ वीज यांना शुक्रवारी भेटले होते. हरियानात आंदोलनकारी शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावेत अशी मागणी त्यांच्याकडे करण्यासाठी ते वीज यांना भेटले होते. त्यांच्या आधी योग गुरू रामदेव बाबा वीज यांना मंगळवारी भेटले होते. त्यामुळे आता या सर्वांनाही करोना चाचण्या करण्याची सुचना करण्यात आली आहे.
67 वर्षीय वीज हे भाजपचे अंबाला कॅन्टोन्मेंट मतदार संघातील आमदार आहेत. त्यांना 20 नोव्हेंबर रोजी कोव्हॅक्सिन लसीचा डोस देण्यात आला होता. या लसीच्या तिसऱ्या चाचणीत स्वयंसेवक म्हणून त्यांनी ही लस घेतली होती. भारत बायोटेक कडून ही लस तयार करण्यात आली असून त्याच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या आता सुरू झाल्या आहेत.