सेऊल : जगात कोरोनाने हैदोस घातला घातला आहे. त्यातच कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी आपल्या देशातील नागरिकांना काही नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, उत्तर कोरियाचे हुकुमशाहा किम जोंग उन यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. किम जोंग उन यांनी उत्तर कोरियात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. तसेच हे नियम मोडणाऱ्यांना कठोर शिक्षाही केली जात आहे. इतकेच नाही तर नियम मोडणाऱ्याला मृत्यूदंडाचीही शिक्षा देण्यात येत आहे.
उत्तर कोरियात किम जोंग उन यांनी करोनाबाबत घालून दिलेले नियम मोडल्यामुळे संबंधित व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. किम जोंग उन यांनी संबंधित व्यक्तीनं नियम मोडल्याचं सांगत त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. संबंधित व्यक्तीला फायरिंग स्क्वाडच्या हाती सोपवण्यात आलं. त्यानंतर त्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या. इतकंच नाही तर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार किम जोंग उन यांनी आपल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी चीनच्या सीमनेवर अँटी एअरक्राफ्ट बंदुकाही तैनात केल्या आहेत. त्याद्वारे एका किलोमीटरपर्यंतही कोणालाही गोळ्या घालता येऊ शकतात, असे माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार सांगण्यात आले आहे.
इंग्रजी वर्तमानपत्रानुसार किम जोंग उन यांनी २८ नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीला करोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. नियम मोडत त्या व्यक्तीनं चिनी सामानाची तस्करी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तस्करी करताना त्या व्यक्तीला स्थानिक सुरक्षा दलानं ताब्यात घेतलं. त्यानंतर त्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या.