नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनाविषयी बदनामीकारक वक्तव्ये ट्विटरवरून जारी केल्या प्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा अडचणीत आली आहे. दिल्ली शिख गुरूद्वारा प्रबंधक समितीने तिला या प्रकरणी नोटीस जारी केली आहे.
या वक्तव्यांबद्दल माफी मागावी अन्यथा तिच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे या समितीने म्हटले आहे. या संबंधात माहिती देताना या समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा यांनी म्हटले आहे की, शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याची वृद्ध माता ही शंभर घेऊन कोणत्याही आंदोलनात सहभागी होत असते असे विधान कंगनाने केले होते.
या असंवेदनशील विधानाबद्दल कंगनाने माफी मागीतली पाहिजे. ज्या वृद्ध महिला आंदोलकाचा फोटो कंगनाने शेअर केला होता ती महिला शाहीनबाग आंदोलनात सहभागी झालेल्या बिल्कीस बानो असल्याचा समज करून घेत कंगनाने ही शेरेबाजी केली होती.
पण तिचा तो समज खोटा ठरला आहे. या प्रकरणात अनेक आंदोलकांनी कंगनावर जोरदार ट्रोलिंग करीत तिचा निषेध केला होता. दरम्यान कंगनाचे ट्विटर अकौंट बंद करावे या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे कंगनाचे चौफेर हसू होवू लागले आहे.