पुणे – करोनामुळे रक्त आणि प्लाझ्मा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थिती काही खासगी रक्तपेढ्या जादा पैसे घेऊन रक्त किंवा प्लाझ्मा देतात. त्याला चाप बसवण्यासाठी राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी नवीन अधिसूचना बुधवारी जारी केली. ठरवलेल्या दरांपेक्षा जास्त रक्कम आकारणाऱ्या खाजगी रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा याद्वारे देण्यात आला आहे. कारवाईचे अधिकार राष्ट्रीय अथवा राज्य संक्रमण परिषद संचालकांना देण्यात आले आहेत.
रक्तपेढ्यांकडून जादा दराने रक्त किंवा प्लाझ्मा बॅग देणे, थॅलेसिमया रुग्णांना रक्त न देणे, त्यांच्याकडून प्रक्रिया शुल्क घेणे, संकेतस्थळावर दररोजचा साठा न दर्शवणे. साठा शिल्लक असूनही पुरवठा न करणे अशा अनेक तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. सद्य:स्थितीत राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या (एसबीटीसी) नियमावलीमध्ये रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत कोणतीही तरतूद नव्हती अथवा संबंधित अधिकाऱ्यांना तसे अधिकारही नव्हते. मात्र, आता रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला.
असे आहेत नवीन नियम
- शासनाने ठरवलेल्या रक्ताच्या प्रक्रियाशुल्कापैकी (रक्तपिशवीची किंमत) जादा शुल्क आकारल्यास त्या जादा आकारलेल्या प्रक्रिया शुल्काच्या पाचपट दंड संबंधित रक्तपेढीकडून आकारण्यात येईल.
- जादा आकारलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येईल व उर्वरीत रक्कम “एसबीटीसी’च्या खात्यावर जमा करण्यात येईल.
- थॅलेसिमया/हिमोफिलिया/सिकलसेल व रक्ताशी निगडीत इतर आजारी रुग्णांकडे मोफत रक्त मिळण्याविषयी “एसबीटीसी’चे ओळखपत्र असताना देखील प्रक्रिया शुल्क आकारल्यास प्रक्रिया शुल्काच्या 3 पट दंड करण्यात येईल.
- यापैकी प्रक्रिया शुल्क संबंधित रुग्णास परत करण्यात येईल व उर्वरीत रक्कम एसबीटीसीकडे जमा करण्यात येईल.
- “एसबीटीसी’च्या संकेतस्थळावर माहिती अद्ययावत न केल्यास विहित कालावधी संपल्यावर प्रतिदिन 500 रुपये दंड आकारण्यात येईल.
- ई रक्तकोष व “एसबीटीसी’च्या संकेतस्थळावर रक्तसाठा व अनुषंगिक माहिती न भरल्यास व तपासणी दरम्यान रक्तपेढी दोषी आढळून आल्यास, प्रति दिन रूपये एक हजार याप्रमाणे दंड “एसबीटीसी’च्या खात्यावर जमा करण्यात येईल.
- सूचना फलकावर/संकेतस्थळावरील माहितीप्रमाणे रक्त उपलब्ध असतानाही थॅलेसिमिया/हिमोफिलिया/सिकलसेल व रक्ताशी निगडीत इतर आजारी रुग्णांना रक्त वितरण करण्यास नकार दिल्यास, रुग्णास द्यावे लागणारे प्रक्रियाशुल्क परत करण्यात येईल. तर एक हजार दंड “एसबीटीसी’च्या खात्यावर जमा करण्यात येईल.
- दंडात्मक कारवाईपूर्वी संबंधित रक्तपेढीला नोटीस देऊन त्यांचे म्हणणे मांडण्याची एक संधी देण्यात यईल.
- रक्तपेढीकडून वारंवार मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले गेल्यास, अशा रक्तपेढ्यांचे परवाने रद्द करण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून रद्द करण्यात येईल.