केपटाऊन –डेव्हिड मलानच्या नाबाद 99 तर, जोस बटलरची नाबाद 67 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने यजमान दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर इंग्लंडने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवत यजमानांना व्हाइटवॉश दिला.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 3 बाद 191 धावा केल्या. त्यात वॅन दर दुसेनने नाबाद 74 तर फाफ डुप्लेसीने नाबाद 52 धावांची खेळी केली. इंग्लंडने विजयासाठी आवश्यक 192 धावा 17.4 षटकांत केवळ एक गडी गमावून पार केल्या व सहज विजय मिळवला.
सलामीवीर जेसन रॉय लवकर बाद झाल्यानंतर मलान व बटलरने दुसऱ्या गड्यासाठी 167 धावांची अभेद्द भागीदारी केली व संघाला विजय मिळवून दिला. मलान आपले शतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. त्याने आपल्या नाबाद 99 धावांच्या खेळीत 47 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार व 5 षटकारांची बरसात केली.
बटलरने नाबाद 67 धावांच्या खेळीत 46 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकार अशी फटकेबाजी केली. करोनानंतरचा इंग्लंडचा हा पहिलाच परदेश दौरा होता व त्यात त्यांनी 3-0 अशी मालिका जिंकत यजमान संघाला व्हाइटवॉश दिला.
99 चा योगायोग
या सामन्यात मलान 99 धावांवर नाबाद राहिला. हा देखील इंग्लंडकडून खेळत असलेल्या फलंदाजाचा योगायोग ठरला. टी-20 सामन्यात नाबाद 99 धावा करणारा मलान शतक पूर्ण करू न शकलेला इंग्लंडचा तिसरा फलंदाज ठरला. 2012 साली अलेक्स हेल्सने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 99 धावांची खेळी केली होती. तर त्याच वर्षी लूक राइटने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नाबाद 99 धावांची खेळी केली होती.