इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना फरार गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित दोन प्रकरणांच्या सुनावणीसाठी वारंवार समन्स बजावूनही गैरहजर राहिल्याबद्दल इस्लामाबाद उच्च न्यायालयाने तो आदेश दिला.
भ्रष्टाचाराशी संबंधित पनामा पेपर्स घोटाळ्यात नाव आल्याने पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना सार्वजनिक पदावर राहण्यास अपात्र ठरवले. त्यामुळे शरीफ यांना 2017 या वर्षी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर 2018 मध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणांत दोषी ठरवत तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
हृदयविकार असल्याने शरीफ यांना मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये उपचारासाठी लंडनला जाण्याची परवानगी देण्यात आली. तेव्हापासून ते तिथेच आहेत. त्यांनी दोषी ठरवण्याच्या निर्णयांना उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यासाठीच्या सुनावणीला हजर राहण्याचे समन्स शरीफ यांना वारंवार बजावण्यात आले.
मात्र, ते हजर राहिले नाहीत. त्यावरून त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटही जारी करण्यात आले. संबंधित प्रकरणी बुधवारी पुन्हा सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने शरीफ यांना फरार गुन्हेगार म्हणून घोषित केले.