मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. त्यानंतर याप्रकरणी ईडीने पहिली अटक केली आहे. प्रताप सरनाईक यांचे जवळचे मित्र अमित चांदोळे यांच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. चांदोळे हे टॉप्स समूहाचे भागीदार आहेत.टॉप्स सिक्युरिटी’ या समूहाविरोधातील आर्थिक घोटाळ्या प्रकरणी सरनाईक कारवाई करण्यात आली आहे.
चांदोळे यांच्या अटकेमुळे सरनाईक आणि राहुल नंदा यांच्यातील व्यवहारांबाबत माहिती समोर येईल अशी ईडीला आशा आहे. नंदा हे टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आहेत. या ग्रुपचे माजी सीईओ रमेश अय्यर यांनी नंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कंपनीच्या निधीचा बेकायदा पद्धतीने फेरफार केल्याचा आरोप केला आहे.
सरनाईक यांच्या कार्यालयावर मंगळवारी छापेमारीदरम्यान ईडीने परदेशी बँकेचं एक डेबिट कार्ड जप्त केलं आहे. फ्रिमोन्ट बँकेने प्रताप सरनाईक यांच्या नावे हे डेबिट कार्ड इश्यू केलं आहे. ज्यावर अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील फरहाद दाद्रास येथील पत्ता आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती देताना, ईडीला या छापेमारीत पैशांच्या व्यवहारांच्या काही नोंदी आणि कागदपत्रे आढळून आले आहेत. या नोंदी हवाला व्यवहारांच्या असल्याचे दर्शवत आहे. ज्या कंपन्यांबाबतच्या या नोंदी आहेत त्या प्रताप सरनाईक यांच्याकडून चालवल्या जातात असे म्हटले आहे.
दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर प्रताप सरनाईक परदेशातून मुंबईत परतल्याने सध्या क्वारंटाइनमध्ये आहेत. त्यांचा क्वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतर ईडीद्वारे त्यांची प्रत्यक्ष चौकशी करण्यात येईल.