चंडीगढ – गुजरातसह काही राज्यांपाठोपाठ पंजाबमध्येही पुन्हा रात्रीची संचारबंदी लागू होणार आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी 1 डिसेंबरपासून होईल. देशात विविध ठिकाणी करोना फैलावाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यापार्श्वभूमीवर, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी बुधवारी राज्यातील करोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर करोना फैलाव रोखण्यासाठी नव्याने निर्बंध लादण्याची घोषणा त्यांनी केली. त्यानुसार, सर्व शहरांमध्ये आणि मोठ्या लोकसंख्येच्या गावांमध्ये रात्री 10 ते सकाळी 5 या कालावधीत रात्रीची संचारबंदी असेल. पंजाबमधील हॉटेल, रेस्टॉरंट आणि विवाहस्थळे बंद करण्यासाठी रात्री 9.30 वाजताची मुदत देण्यात आली आहे.
मास्क परिधान न केल्याबद्दल आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल याआधी त्या राज्यात 500 रुपये दंड आकारण्यात येत होता. पुढील महिन्यापासून दुप्पट म्हणजे 1 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
करोना संसर्गामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या बाधितांवर देखरेख ठेवण्याचा आदेश आरोग्य विभागाला देण्यात आला आहे. पंजाबमधील करोनाबाधितांची संख्या दीड लाखांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. त्या राज्यात करोना संसर्गाने आतापर्यंत 4 हजार 653 बाधित दगावले आहेत.