पटना – नितीश कुमार यांनी आजबिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सातवी वेळ आहे. कुमार यांच्यासह भाजपच्या तारकिशोर प्रसाद आणि रेणू यादव यांनी देखील शपथ घेतली असून नव्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
शपथविधी सोहळा पार पडताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार यांना शुभेच्छा दिल्या असून यासोबतच त्यांनी बिहारच्या विकासासाठी केंद्र सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल असंही म्हंटलंय.
नितीश कुमारांच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी? वाचा संपूर्ण यादी
पंतप्रधानांनी याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करताना, “बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबाबत नितीश कुमार यांचे अभिनंदन. आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अन्य सर्व नेत्यांनाही माझ्या शुभेच्छा. बिहारच्या विकासासाठी एनडीए परिवार एकजुटीने काम करेल. बिहारच्या विकासासाठी केंद्राकडून शक्य ती सर्व मदत देण्याबाबत मी आश्वस्त करतो.”
Congratulations to @NitishKumar Ji on taking oath as Bihar’s CM. I also congratulate all those who took oath as Ministers in the Bihar Government. The NDA family will work together for the progress of Bihar. I assure all possible support from the Centre for the welfare of Bihar.
— Narendra Modi (@narendramodi) November 16, 2020