पुणे- रंगभूमीवरचा नटसम्राट म्हणजेच, दिवंगत अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांची आज जयंती. त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 या दिवशी सातारा येथे झाला. आज त्यांचे वडील बाळकृष्ण लागू हे देखील डॉक्टर होते. आईचे नाव सत्यभामा होते. डॉ. लागू यांचे शिक्षण पुण्यात भावे हायस्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण फर्गसन महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतले.
वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतानाच डॉ. लागू यांना नाटकाची गोडी लागली. त्यांनी त्यावेळेसच नाटकात काम करण्याला सुरूवात केली. पुरोगामी विचारांचा त्यांच्यावर पगडा असल्याने त्यांनी समविचारी असलेल्या भालबा केळकर यांच्यासह पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली.
डॉ. लागू यांनी 1950 च्या दशकात कान, नाक, घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात पाच वर्षे डॉक्टरकी केली. त्यानंतर त्यांनी परदेशात कॅनडा आणि इंग्लंड येथेही पुढील प्रशिक्षण घेतले. 1960 च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.
भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. मात्र त्यात त्यांचे मन रमले नाही. त्यांचा ओढा रंगभूमीकडेच होता. शेवटी 1969 मध्ये त्यांनी डॉक्टरकी सोडली आणि पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित “इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून काम करण्याला सुरूवात केली.
‘डॉ. श्रीराम लागू’ भारतीय चित्रपटाच्या इतिहासातले एक तेजस्वी अभिनय पर्व असलेले, नटसम्राट गणपतराव बेलवलकरांसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे, व्यक्तिमत्व होते. मराठी रंगभूमीवरचा नटसम्राट या शब्दात श्रीराम लागूंचे वर्णन करता येईल. मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट यात यशस्वी मुशाफिरी करणारे लागू खऱ्या अर्थाने रमले ते नाटकातच.
डॉ. श्रीराम लागूच्या रंगभूमीवरच्या एकाहून एक सरस भूमिका गाजल्या त्यातही कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ‘नटसम्राट’ मधील गणपतराव बेलवलकरांच्या भूमिकेने अभिनय कारकिर्दीला हिमालयाची उंची गाठून दिली. त्यातील संवाद फेक ही रसिकांच्या विशेष लक्षात राहिली. त्यानंतर शांताराम बापूंच्या ‘पिंजरा’तल्या अभिनयाने तर इतिहास घडवला.
‘सामना’, सिंहासन’, ‘मुक्ता’ या सारख्या चित्रपटांमुळे डॉ. लागू आणि राजकीय चित्रपट हे समीकरण जुळले. दरम्यान, 17 डिसेंबर 2019 रोजी डॉ. श्रीराम लागू यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.