पालिकेच्या आकाश चिन्ह विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष
बिबवेवाडी – दिवाळीच्या लक्ष्मी मुहुर्तावर तर बाजारपेठेत मोठी उलाढाल सुरू झाली आहे. परंतु, व्यवसायात लाखोंची उलाढाल करणारे उत्पादक अद्यापही महानगरपालिका प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करीत हव्या त्या ठिकाणी जाहिरातबाजी करीत आहेत, अशा फुकट्या जाहिरातबाजीमुळे पालिकेचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे.
नागरिकांकडे करासाठी तगादा लावणाऱ्या पालिका प्रशासनाने अशा जाहिरातदारांनाही कारवाईचे टोचण द्यावे, अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे. दिवाळीचा सण “कॅश’ करण्यासाठी अनेक उत्पादकांकडून फुकटात जाहिरातबाजी केली जात आहे. वाटेल त्या ठिकाणी फ्लेक्स्लावून शहर विद्रुप केले जात आहे. शहर तसेच उपनगरांत अशा प्रकारच्या फुकट्या जाहिरातींचे फ्लेक्स् मोठ्या प्रमाणात लागले आहेत.
महापालिकेच्या दिशादर्शक फलकावरही अनेक ठिकाणी जाहिरातबाजी करण्यात आली आहे. यातून मनपाचा दिशादर्शक फलक झाकले जात आहेत. स्वारगेट ते कात्रज सातारा रस्त्यावर सिटी प्राईड चौक, वाळवेकर लॉन, भारती विद्यापीठ येथील दिशादर्शक फलक जाहिरातबाजीमुळे झाकले गेले आहेत, अशा बेकायदा फलकांकडे पालिकेच्या आकाश चिन्ह विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
मनुष्यबळ कमी असल्याने कारवाई करणे शक्य होत नव्हते. तसेच, टेंडर सुद्धा संपले आहे. तरीही प्रयत्न करून कारवाई करत आहोत. दिवाळी असल्याने अनधिकृत फ्लेक्स लागण्याचे प्रमाण वाढले आहे.
– सचिन खेडेकर, आकाशचिन्ह विभाग, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय