पुणे – आर्मीतील एका निवृत्त सर्जनची नोकरीच्या आमिषाने तब्बल 10 लाख 77 हजाराची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी आयटी ऍक्ट अंतर्गत एका अज्ञात व्यक्तीविरुध्द स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आर्मीतून सर्जन म्हणून निवृत्त झाले आहेत. निवृत्त झाल्यानंतर ते नोकरीच्या शोधात होते. यासाठी त्यांनी ऑनलाईन नोकरीविषयक वेबसाईटवर आपले बायोडाटा टाकला होता. याला प्रतिसाद देत एका व्यक्तींने त्यांना मेलव्दारे संपर्क साधला.
त्यांना दुबईतील एका रुग्णालयाच्या नावेचे खोटे लेटरहेड व आयकार्ड पाठवून विश्वास संपादन केला. यानंतर दुबईला जाण्याचा खर्च, रहाण्याचा खर्च इतर खर्च म्हणून 3 ते 27 डिसेंबर 2019 दरम्यान त्यांच्याकडून 10 लाख 77 हजार रुपये ऑन लाईन पध्दतीने घेतले. पैसे घेतल्यानंतर त्यांना नोकरी दिली नाही. तसेच त्यांच्याशी संपर्क तोडून टाकला.
फिर्यादीने सायबर सेलला तक्रार अर्ज दिला होता. त्यावरुन स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश मोरे करत आहेत.