#प्रभात_दीपोत्सव_२०२० : आपलेपणाचा बहर फुलताना…

– अॅड. भाग्यश्री चौथाई


साधारण फेब्रुवारीच्या महिन्याच्या सुरुवातीला हिमानी समुपदेशनासाठी माझ्याकडे आली होती. बऱ्यांच दोलायमान परिस्थितीत होती. आशेची बाब एकच म्हणजे घटस्फोट घ्यावा अशा टोकाच्या निर्णयाप्रत आली नव्हती. तरी पण 15 वर्षाच्या संसारात सुखी. समाधानी निश्‍चित नव्हती. लवकरच पुढील काही दिवसात निवांतपणे बोलू या असं ठरवून आम्ही एकमेकींचा निरोप घेतला. पुढचे काही दिवस असेच कामात गेले. माझी मध्य प्रदेशची सहल होती. तेव्हा तिचा फोन आला. मार्चच्या पहिला आठवड्यात भेटायचे ठरले. 

मार्चचा पहिला आठवडा संपतोय तोच करोना आला. बरीचशी समुपदेशनाची कामे आता ऑनलाइन सुरू झाली. परंतु हिमानीचा काहीच संपर्क होऊ शकला नाही. मी देखील कामात बिझी झाले. असेच चार-पाच महिने गेले. सप्टेंबर उजाडला. एक दिवस सकाळी सकाळी हिमानीचा फोन आला. आवाजावरून लगेचच लक्षात आले, गडी एकदम खूश दिसत होता.

“भेटायला कधी येते आहेस?’ मी सहजच प्रश्‍न केला. मॅडम भेटायला तर येणारच आहे.पण ते समुपदेशन, घटस्फोट वगैरे कॅन्सल..ती आनंदून बोलत होती. तिच्या आवाजातला आनंद, जो मी आधीच ओळखला होता तोच आनंद, उत्साह आता ओसंडून वहात होता.

लॉकडाऊनच्या काळात घरातच राहिल्यामुळे नवरा आणि तिच्यात पूर्वीचा सुसंवाद नव्याने सुरू झाला होता. याआधी दोघेही कामाच्या व्यापात प्रचंड व्यग्र असल्याने नातं फुलायला, बहरायला
एकमेकांना द्यावा लागणारा वेळ देतां न आल्याने गैरसमज वाढत जाऊन, नातं डगमगायला लागलं होतं. करोना नामक साथीमध्ये असाही सकारात्मक फायदा होऊ शकतो, याची जाणूव मलाही नव्यानेच झाली होती.

सुहास जोशी आणि त्यांची पत्नी वय वर्षे 60 च्या पुढे. करोनाच्या काळात घरात दोघेजणच. एक मुलगी अमेरिकेत तर दुसरी वंदना जवळ राहणारी असली तरी लॉकडाऊनमुळे सारखी येऊ-जाऊ शकत नव्हती. बाहेरून नाष्टा-जेवणाचा डबा मिळत असला तरी घरातल्या कामांना असणाऱ्या मदतनीस कुठे येत होत्या? त्यामुळे आता वयामुळे हळूहळू उठत-बसत केर-फरशी, भांडी-धुण्याचे मशीन लावणे, जेवणानंतरची झाकपाक, आवराआवरी यांत काकूंना दुपारचे तीन वाजून जात.

जरा कुठे पाठ टेकायचा अवकाश की चहाची वेळ येई. अशा वेळी काका दोघांचा चहा करत. काकूंच्या कष्टांची जाणिव या काळात झाल्याचं ते आवर्जून नमूद करतात. या वयात एकमेकांना आधार देत जगणं, स्वत:च्या तब्येतीबरोबरच जोडीदाराची तब्येत आणि मन जपणं; त्याच्या कष्टांची जाणिव ठेवणं; जमेल तसा हातभार लावणं या गोष्टी नव्याने केल्या गेल्या, असं दोघेही सांगतात. दोघांकडे बघून प्रगल्भ सहजीवन म्हणजे हेच ते की काय अगदी असं वाटावे.

“करोना’नंतरचे जग हे प्रत्येक पातळीवर वेगळे असणार आहे. माणसा-माणसांमधील नात्यांमधे तर अधिकच बदल होणार आहेत. पण मग हे बदल असे सकारात्मक असतील, नातं बहरायला ऊर्जा देणारे असतील तर नात्यांना वेगळा अर्थ नक्कीच प्राप्त होईल.

आता हेच बघा ना. सौरभ आणि दर्शनाचे लग्न लॉकडाऊन काळात लागलं. सगळीच अनिश्‍तिता असताना अजून लांबणीवर कशाला टाकायचे? या दृष्टिकोनातून जवळच्या नातेवाईक मंडळींच्या उपस्थिती- मध्ये त्यांनी लग्नाचा बार उडवून दिला. खरं तर दोघांचे मौजमजेचे, हिंडा-फिरायचे दिवस. लग्नानंतरचे दिवस केवळ एकमेकांच्या संगतीत घालवायचे, एकमेकांना समजून घ्यायचे. दोघांच्याच अशा स्वतंत्र फुलपाखरी साम्राज्यात रममाण व्हायचे पण करोनाने त्यावर पाणी फिरवलं आणि लॉकडाऊनने त्यांना घरी बसवले. तरीही या काळात त्यांना एकमेकांसाठी वेळ देतां आला. घरातील कामं मिळून करता आली.

जोडीदाराच्या आवडी-निवडी समजून घेता आल्या. स्वत:चा संसार उभा करताना सुरुवातीच्या नव्या नवलाईच्या दिवसात एकमेकांची मिळालेली अशी साथ संसाराचा पुढील पाया रचायला नक्कीच उपयोगी पडेल असं ते दोघं सांगतात. हे सगळं किती छान आहे. करोनाने दोघांचा असा फायदा करून दिला तर!
संध्याकाळी मोबाइलची बॅटरी लो होते आणि लाल सिग्नल देते तसं आयुष्य झाले होते. त्याला चार्ज करायची गरज समजून येत होती; पण स्वत:ची लो झालेली बॅटरी वरचेवर सिग्नल देऊनदेखील तिच्या बाबतीत काहीच केले जात नव्हते. गेल्या काही वर्षांत आपल्या जगण्याचा वेग तुफान वाढला होता. जीवनाच्या वेगवान गाडीची चावी “करोना’ नामक साथीने जणू काढून घेतली.

सगळ्या जगात एकदम अशी अचानक साथ आली आणि आपण सगळे घरात अडकून पडलो. कौटुंबिक नात्यांचे पदर नव्याने उलगडत गेले. एरवी एकमेकांना गृहित धरण्याची आपली सवय. त्यामुळे काय फरक पडतोय असा काहीसा बेफिकिर सूर आळवत संसार रेटणं चालू होते. दिवस उजाडला की मागील पानावरून पुढे असंच काहीसं.पण करोनाने यामधे आमुलाग्र बदल घडून आणला. या काळात काहींच्या सहजीवनाने कात टाकली. नाती नव्याने समजू-उमजू लागली.

“करोना’मुळे माणसाच्या आयुष्याची दिशा बदलणार आहे. सगळ्या बदलाला सामोरे जायला, बदल स्वीकारायला आपलीच माणसं मदतीला येणार आहेत, याची ओळख झाली. नात्यांमध्येदेखील वेगळ्या गरजा निर्माण झाल्या. किती सहजपणे घरातील कामांच्या जबाबदाऱ्यांचे वाटप झाले. सहजपणे
समोरच्या व्यक्तीची गरज ओळखून मदतीला घरातील इतरांचे हात सरसावले. कारण बाहेरून मदत मिळणे कोणालाच शक्‍य नव्हते. घरातल्या व्यक्तींनीच एकमेकांना भरीव अशी साथ दिली.

दिवसेंदिवस एकमेकांसमोर न येणारे कुटुंबातील सदस्य आता “24 तास परिचयात अवज्ञा’ होते की काय असं वाटावे, इतके समोर उभे ठाकत होते. एकमेकांशी तुटत-हरवत चाललेला संवाद त्यानिमित्ताने साधत होते. हे फारच आशादायी चित्र होते. घरातील सकारात्मक ऊर्जा, सोबत असलेली माणसं हीच आपली संपत्ती. त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू हेच, “हेच ते ज्यासाठी केला होता अट्टाहास…’ असं आनंदी-आशादायी चित्र जणू आपल्या घराचं झालंय, असा फिल कित्येक जणांनी घेतला.

बाहेरच्या जगात “करोना’ नामक निराशेचे ढग पसरून काळोख दाटला असला तरी घराघरांत कौटुंबिक पातळीवर मात्र बरेच सकारात्मक बदल घडून येताना दिसत होते. “पेला अर्धा रिकामा आहे यापेक्षा तो अर्धा भरलेला आहे,’ याकडे अधिक लक्ष या काळात गेले. कोणतेही काम कमी दर्जाचे नाही, शारीरिक कष्टदेखील सुखकारक असतात. कारण ते आपल्या लाडक्‍यांसाठी केलेले असतात. “आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर…’ याचं महत्त्व मुलांना कळलं.कारण त्यांनी आईबरोबर कामाचा अनुभव घेतला.

“करोना’च्या काळात आर्थिक गणिते जुळवताना नवनवीन कल्पना आविष्कार घडत गेले. आपल्या नेहमीच्या आखीव-रेखीव चौकटीपेक्षा वेगळं काहीतरी करायची संधी “करोना’ने वैयक्तिक पातळीवर दिली. मला माहीत असलेल्या एका प्रसिद्ध प्रकाशक महिलेने या काळात घरगुती घडीच्या पोळ्या आणि भाकऱ्या स्वत: करून विकल्या. खरंच “करोना’ने ही वेगळी दृष्टी आपल्या सगळ्यांना दिली. कोणतेही काम कमी दर्जाचे नाही. मला जमणारे नाही किंवा मी हे कसं करू? असा अहंभाव कमी करण्यास “करोना’ने मदत केली. किती चांगली गोष्ट घडली आहे ही मंडळी.

नोकरी जाणं, पगारात कपात, पगार न मिळणं, आर्थिक ताण आणि यांतून येणारा सगळा मानसिक तणाव पेलायला कुटुंबाची महत्त्वाची साथ मिळणं किती भाग्याचे. कित्येकांनी त्याचा अनुभव घेतला. या सगळ्यातून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी किंवा आलेल्या बिकट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कुटुंबाची भरभक्कम साथ किती आवश्‍यक असते, याचा नव्याने अनुभव आला. कुटुंबातील सदस्यांनी “आम्ही तुझ्या पाठीशी आहोतच,’ अशी दिलेली थाप याच काळात अनुभवता आली.

सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे घरकामाला, शारीरिक कष्टांना मिळालेली प्रतिष्ठा. केर-, ओटा पुसणं, टॉयलेट साफ करणं ही सगळी कामे याआधी होती, घरकाम मदतनीसांची.पण “करोना’च्या काळात घरातल्या सगळ्यांनी जबाबदारी अंगावर घेऊन मिळून मिसळून सगळी कामे केली.

“पैसे फेकले की बाजारात सगळं काही मिळतं,’ असा काहीसा मतप्रवाह तरुणाईमध्ये नकळत का होईना डोकावू लागला होता.त्याला बरोबर खीळ बसण्याचे काम करोनाने केलंय. अगोदर किती सहजपणे, “दिवसभर तू करतेस तरी काय?’ असा प्रश्‍न बायकोला-आईला विचारला जायचा. तेच आईचे काम आता लेकरांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले आणि त्यात खारीचा तरी का होईना वाटा उचलता आला, याचं समाधान आणि आनंद त्या मातेच्या चेहऱ्यावर झळकला. त्याची मज्जा काही औरच.

वैयक्तिक पातळीवर आपल्या बकेट लिस्ट मधल्या राहून गेलेल्या बऱ्याचं सकारात्मक गोष्टी या काळात करता आल्या. त्याचे अतिव समाधान याकाळाने दिले व त्यामुळे पुढील कठीण काळात जगण्याची उमेद देखील मिळाली. घरात बसल्या-बसल्या नवननवीन प्रयोग केले गेले.

आम्ही घरच्या घरी मायक्रो-ग्रीन उगवले. चवळी, मटकी, मूग, हरभरा, कोथिंबीर पेरली. सृजनाचा अविष्कार डोळे भरुन पाहिला. तसंच प्रत्यक्ष अनुभव घेतला. एरवी बाजारातून पैसे फेकून आणलेल्या गोष्टीची काडीची देखील किंमत नसते; पण इथे घरी उगवलेल्या कोथिंबीरीच्या काडयादेखील फेकून द्याव्याशा वाटत नसे. खरंच असे अनुभव नकळत श्रीमंत करुन गेले.

जगायला काय लागते? याचं उत्तर याकाळाने आपल्याला दिले. केवळ काय लागते याची जाणीव नाही; तर किती लागते याचा अंदाजसुद्धा याच काळात अनुभवता आला. खरं तर याआधी देखील आपण आपलं अंथरुण पाहूनच पाय पसरणारी माणसं होतो पण आता अजूनही छोटं पांघरुण स्वेच्छेने अंगावर घेऊ शकतो, असा आत्मविश्‍वास या काळाने दिला. पाय पोटाशी घेऊन झोपण्यातला ऊबदारपणा अनुभवता आला. यापेक्षा अजून चांगली कोणती गोष्ट असेल मंडळी?

लॉकडाऊनच्या काळात अडी-अडचणीत असलेल्यांना मदत करायला अनेक हात सरसावले. केवळ “मी आणि माझे कुटुंब’ असा मर्यादित परिघ न ठेवता सामाजिक जबाबदारी म्हणून नाष्टा-जेवणाचे डबे दिले. “मी पोहचवतो डबा; कोणाला द्यायचा आहे सांग?’ त्यावेळी असं लेक विचारतो तेव्हा सामाजिकतेचे भान पुढील पिढीत नकळत आपसूक रुजले असल्याची भावना अतीव समाधान देणारी ठरली आहे.
आयुष्य हे कायमच अळवावरचे पाणी राहिलंय, याचा अनुभव आपण कधी ना कधी घेत होतोच; पण “करोना’मुळे आजचा दिवस, आत्ताचा क्षण आपला आहे, हे मात्र समजले आहे.

त्यामुळे जगण्याचे प्राधान्यक्रम ठरले. माणूस सतत भविष्याचा विचार करत रहायचा आणि वर्तमान काळात जगणं जणू विसरलाच होता. पण आज झालेला महत्त्वाचा बदल म्हणजे वर्तमानात तो आनंद शोधतोय.त्यासाठी त्याला वेगळ्या कशाचीही गरज नाही. कुटुंबाची साथसंगत असणं पुरेसे वाटू लागलयं.

तसं पाहता लॉकडाऊनने आपली सगळ्यांचीच एकूण सगळ्याचं दृष्टिकोणातून परिक्षा घेतली. ज्या ज्या गोष्टींशिवाय आपण जगू शकणार नाही, असं वाटत होते त्या सगळ्या सगळ्या गोष्टींशिवाय आपण जगायला शिकलोय.

गेल्या काही वर्षातील माध्यम-क्रांतीने जग जवळ आलेच होते; पण आता ते घरबसल्या आपल्या इटुकल्या हातात मावायला लागलयं.अन्न-वस्त्र-निवारा या गरजांप्रमाणेच सोशल मीडिया ही नवीन गरज वाढलीय. गेल्या काही महिन्यात एकमेकांशी संवाद केवळ या माध्यमांमार्फत साधला गेलायं. मग ते व्हॉटसऍप-फेसबुक-इन्स्टाग्राम असो की ऑडिओ-व्हीडिओ. लॉकडाऊनच्या काळात तर आपल्या जवळच्या मंडळींशी याच माध्यमातून का होईना, सूर जमायला लागले आहेत. “करोना’ने केवढा बदल घडवून आणलाय मंडळी.

वैयक्तिक पातळीवर माणसे तब्येतीच्या बाबतीत खूप जागरुक झाली. आपला आहार.व्यायाम. जोडीला प्राणायाम. स्वच्छतेच्या सवयींबरोबरच स्वत:कडे पाहण्याची वेगळी दृष्टी प्राप्त झाली. स्वत:कडे लक्ष देणे, आपल्या आवडीनिवडी जपणं, स्वत:साठी खास वेळ काढणं प्रामुख्याने होऊ लागले. “करोना’च्या प्रादुर्भावाने सगळं जग काळंवडले असले तरी वैयक्तिक पातळीवरील हा बदल नक्कीच सुखावह आहे.
“करोना’ने अजून एक महत्त्वाचा बदल आपल्या जीवनात घडवून आणला तो म्हणजे घरच्या अन्नाला मिळालेली प्रतिष्ठा. सात्विक, ताजे, रुचकर, आपल्या प्रेमाच्या व्यक्तीने बनवलेले जेवण म्हणजे परमोच्च पर्वणी. यापेक्षा सुंदर या जगात दुसरं काहीच असू शकत नाही, हा आत्मिक आनंद.

घरातील तरुण मुलांची अर्थात मुलींची देखील स्वयंपाकघऱातील मजल मॅगी फारतर फार ऑम्लेटपर्यंत जात असे. या काळात त्यांनी विविध नवनवीन प्रयोग स्वयंपाकघरात केले. भाताचा कुकर लावण्यापासून ते पोळ्या; पुढची उडी थेट ब्रेड मग पिझ्झा. हा सकारात्मक बदल नक्कीच “करोना’च्या काळात घडून आला.

करोना नामक प्रपातामध्ये मनाचा घडा सकारात्मक ऊर्जेने भरलाय. हे काय थोडं कमी आहे का मंडळी? लॉकडाऊनच्या काळात आपल्या जगण्याचा केंद्रबिंदू बदलला आहे.मला नक्की काय हवयं? हे नीटसं कळायला लागलयं. स्वत:कडे, नात्यांमध्ये नव्याने बघण्याची दृष्टी आलीयं. परस्पर नात्यांत अलगद डोकवता आल्याने तिथला आपलेपणाचा आलेला बहर आता चक्क दिसू लागलायं. जणू करोना काळात विणला गेलेला नात्यांचा ऊबदार गोफ.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.