पुणे – करोनाच्या संकटामुळे फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचे काही शाळांनी ऑनलाइन शिक्षण थांबवले आहे. या शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी पालक, विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या शिक्षण मंडळ कार्यालयात तीव्र आंदोलन केले. दरम्यान, “शाळांवर कठोर कारवाई न केल्यास महापालिकेच्या शिक्षण मंडळ कार्यालयास ठाळे ठोकू’ असा इशाराही देण्यात आलेला आहे.
करोना आणि लॉकडाउनमुळे पालकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. शाळा बंद असल्या, तरी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्यात आले. शाळांनी विद्यार्थी, पालकांकडे फी वसुलीचा तगादा सुरुवातीपासून लावलेला आहे. विद्यार्थ्यांनी फी भरली नाही, असे कारण पुढे करुन काही शाळांनी संबंधित विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण अचानक बंद केल्याचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. या विरोधात पालकांनी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके, पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनिल कुऱ्हाडे, महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी मीनाक्षी राऊत यांच्याकडे तक्रारी नोंदवल्या आहेत.
प्रशासनाने शाळांना केवळ कारवाईबाबतच्या नोटीस बजावल्या. चौकशी समिती गठीत करण्यात आल्या होत्या. मात्र, शाळांनी या नोटीसांना केराची टोपलीच दाखवली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. काही मुलांना शिक्षण दिले जाते व काही मुलांना शिक्षण नाकारले जाते आहे. ही विषमता दर्शविणारी वागणूक असून असा भेदभाव करण हा बाल हक्क व शिक्षण हक्क कायद्यानुसार गुन्हा आहे. पुणे पॅरेन्ट्स युनायटेड, पालक संघ, पॅरेन्ट्स असोसिएशनने समन्वयक मुकुंद किर्दत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन शाळांवर गुन्हा नोंदवण्याचा आग्रह महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी मीनाक्षी राऊत यांच्याकडे धरण्यात आला आहे.
फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण थांबवणाऱ्या शाळांना नोटीस बजावल्या आहेत. आता शाळांना पुन्हा एकदा इशारा देण्यात येणार आहे. समन्वयाने प्रश्न न सुटल्यास संबंधित शाळांवर कठोर कारवाई करण्याबाबत महापालिका आयुक्त व विधी विभागांचा अभिप्राय घेण्याच्या हालचालीही सुरू आहेत.
– मीनाक्षी राऊत, प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ, मनपा.