मुंबई – अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित निवडणूकीमध्ये अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी विजय मिळवला. यावरून शिवसेनेने आपले मुखपत्र सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.
शिवसेना म्हंटले कि, अमेरिकेत सत्तांतर झालेच आहे, बिहार सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर आहे. अमेरिकेत प्रे. ट्रम्प महाशयांनी कितीही अकांडतांडव केले, तरी डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडन हे दणदणीत मताधिक्याने राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले आहेत. त्याच वेळी हिंदुस्थानातील बिहारच्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव होताना स्पष्ट दिसत आहे. आपल्याशिवाय देशाला किंवा राज्याला पर्याय नाही, या भ्रमातून नेत्यांना बाहेर काढण्याचे काम लोकांनाच करायचे असते. प्रे. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदासाठी कधीच लायक नव्हते. त्यांच्या माकडचेष्टा व थापेबाजीस अमेरिकेची जनता भुलली, पण त्याच ट्रम्प यांच्याबाबत केलेली चूक अमेरिकन जनतेने फक्त चार वर्षांत सुधारली. त्याबद्दल तेथील जनतेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच.
पराभूत झाल्यावरही धडपणे सत्ता सोडतील ते ट्रम्प कसले? त्यांनी कोर्टबाजी, आरोप-प्रत्त्यारोप सुरू केले, इतकेच नव्हे तर आपल्या भाडोत्री समर्थकांना बंदुका घेऊन रस्त्यावर उतरवले, हिंसाचार घडवला. अशा माणसाच्या हाती अमेरिकेची सूत्रे चार वर्षे होती व हिंदुस्थानातील भाजप पुढारी व राज्यकर्ते ‘नमस्ते ट्रम्प’साठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करीत होते.
ट्रम्प यांचा पराभव म्हणजे माजोरडेपणाचा, पैशांच्या मस्तीचा पराभव आहे. हाती सत्ता, पैसा आणि टगे मंडळींची टोळी असली की, हवे ते साध्य करता येते या मस्तीचा पराभव आहे. लोकशाहीत जय आणि पराभव हे नम्रपणे स्वीकारायचे असतात, लोकांचे आभार मानायचे असतात, पण या नम्रपणाचे कोणतेही संस्कार नसलेल्या ट्रम्प यांनी लोकांचा कौल ठोकरून जे तांडव सुरू केले आहे, ते कृत्य भयंकर आहे. अशा ट्रम्पसाठी आपल्या देशात स्वागताच्या पायघडय़ा घातल्या गेल्या, हे विसरता येणार नाही. चुकीच्या माणसांच्या मागे उभे राहणे ही आपली संस्कृती नाही, पण तसे पायंडे पाडले जात आहेत. ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आले तर पाहावे इतकेच आता म्हणता येईल, असा सल्ला शिवसेनेने पंतपधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.
अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी हिंदुस्थानी वंशाच्या कमला हॅरिस यांची व्यक्तिगत पातळीवर निंदानालस्ती करण्याचा प्रकार ट्रम्प यांनी केला. एक महिला म्हणूनही कमला हॅरिस यांचा सन्मान राखण्याचे सौजन्य ट्रम्प यांनी दाखविले नाही व अशा ट्रम्प यांचे सगळय़ात मोठे पाठीराखे म्हणजे पंतप्रधान मोदी व भाजपवाले होते. आता हिंदुस्थानी वंशाच्या कमलाबाई अमेरिकेच्या उपराष्ट्रपती झाल्याचा आनंद जगभरातील भाजपाईंना झाला असेल तर ते ढोंग आहे. कारण या कमला हॅरिस यांच्याबाबत सोशल मीडियावरून अपप्रचार करण्यात भाजपाई मंडळीच आघाडीवर होती. आता जर तेच हॅरिस बाईंच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करीत असतील तर हा ‘ट्रम्प’छाप विनोद म्हणावा लागेल, असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे.
ते काही असो, हिंदुस्थानने ‘नमस्ते ट्रम्प’ केले असले तरी अमेरिकेच्या सुज्ञ जनतेने ट्रम्प यांना ‘बाय बाय’ करून चूक सुधारली. सत्तांतराचे बाळंतपण पार पडले आहे. हिंदुस्थानातील बिहारातही तसेच सत्तांतर होत असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. पंतप्रधान मोदींसह नितीशकुमार वगैरे नेते तरण्याबांड तेजस्वी यादवसमोर टिकाव धरू शकले नाहीत. खोटेपणाचे फुगे हवेत सोडले, ते हवेतच गायब झाले. लोकांनीच बिहारची निवडणूक हाती घेतली. त्यांनी पंतप्रधान मोदी, नितीशकुमार यांना जुमानले नाही.
तेजस्वीच्या सभांतून लाटा उसळत होत्या व पंतप्रधान मोदी, नितीशकुमारसारखे नेते निर्जीव मडक्यांसमोर घसे फोडत असल्याचे चित्र देशाने पाहिले. बिहारात पुन्हा जंगलराज येईल अशी भीती दाखविण्यात आली, पण लोकांनी बहुधा स्पष्टच सांगितले, ‘‘आधी तुम्ही जा, जंगलराज आलेच तर आम्ही निपटून टाकू!’’ अमेरिका व बिहारातील जनतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच! जनता हीच श्रेष्ठ व सर्वशक्तिमान आहे. जो बायडन आणि तेजस्वी यादव यांचा संघर्ष अन्याय, असत्य, ढोंगशाहीविरुद्ध होता. तो यशस्वी होताना दिसत आहे, असेही शिवसेनेने म्हंटले आहे.