मुंबई – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरणाऱ्या कंगना रानौतने आज आपला मोर्चा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडे वळविला आहे. बायडन यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र अभिनेत्री कंगनाने मात्र त्यांच्यावर टीकेची झोड उठवत बायडन यांचा उल्लेख चक्क ‘गजनी’ असा केलाय.
याबाबत कंगनाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करताना, ‘बायडन राष्ट्राध्यक्षपदावर वर्षभराहून अधिक काळ टिकणार नाहीत’ असं भाकीत देखील केलं आहे. मात्र यावेळी तिने उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचं तोंडभरून कौतुक केलंय. हॅरिस यांचं कौतुक करताना कंगनाने, ‘एक महिला जेव्हा तिची कारकीर्द घडवत असते तेव्हा ती तो रस्ता इतर महिलांसाठीही खुला करते.’ असं म्हंटलंय.
कंगनाकडून बायडन यांचा गजनी असा उल्लेख
बायडन यांच्याबाबत केलेल्या ट्विटमध्ये कंगनाने त्यांचा उल्लेख गजनी असा केला आहे. गजनी हे आमिर खान याच्या एका चित्रपटाचे नाव असून यामध्ये आमिरने वारंवार स्मृतिभ्रंश होणारे पात्र साकारले आहे. याच चित्रपटाचा धागा पकडत कंगनाने बायडन यांचा उल्लेख गजनी असा केलाय.
दरम्यान, बायडेन यांच्यानंतर कमला हॅरिस याचं अमेरिकेच्या राज्यकारभाराचा गाडा हाकतील असंही भाकीत तिने आपल्या ट्विटमध्ये केलं आहे. कंगनाची भाकीत खरी ठरणार का हे तर वेळच सांगू शकेल. परंतु आपल्या बडबोल्या स्वभामुळे सदैव माध्यमांच्या प्रकाशझोतात राहणारी कंगना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाबाबत नोंदवलेल्या या भाकितांमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे हे नक्की.
Not sure about Gajni Biden who’s data crashes every 5 minutes, all the medicines they have injected in to him he won’t last more than a year, clearly Kamal Harris will run the show.
When one woman rises, she makes the way for every woman.
Cheers to this historic day 👏👏👏 https://t.co/hpcy0YksRz— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 8, 2020