कर्जत- कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने कुळधरण येथे कल्याण मटका अड्ड्यावर छापा टाकून एकास ताब्यात घेतले. या छाप्यात पोलिसांनी देविदास तात्याबा उदमले (वय 49) यास ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, कुळधरण येथे देविदास उदमले हा चिठ्ठीवर आकडे लिहून त्यावर पैसे घेवुन कल्याण मटका नावाचा हारजीतीचा जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांना गुप्त बातमीदाराकडून समजली.
त्यानुसार पोलीस नाईक केशव व्हरकटे, पोलीस कॉन्स्टेबल आदित्य बेल्हेकर, लहु खरात, हृदय घोडके, सागर जंगम यांच्या पथकाने खासगी वाहनाने कुळधरण येथे जावून कारवाई केली. एसटी स्टॅन्डसमोर एका टपरीच्या आडोशाला चिठ्ठीवर आकडे लिहुन त्यावर पैसे घेताना आढळून आल्याने देविदास उदमले याची झडती घेण्यात आली.
या झडतीमध्ये पोलिसांना 10,20, 50,100 रुपयांच्या नोटा असलेली 5310 रुपयांची रोकड रक्कम, चिठ्ठ्या व बॉल पेन आढळून आला. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील स्ट्रायकींग फोर्समधील पोलीस कर्मचारी सागर जंगम यांनी या प्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.