पिंपरी, (प्रतिनिधी) – कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने कर वसुलीचे एक हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. उद्या शुक्रवार (दि. २९) पासून महापालिकेला तीन दिवस सुट्टी आहे.
मात्र, या तीन दिवसांत सकाळी साडेनऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत नागरिकांना कर भरता यावा, यासाठी कॅश काऊंटर सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच, सध्या महापालिका तिजाेरीत ९१० काेटींचा महसूल जमा झाला आहे. शेवटच्या तीन दिवसांत ९० काेटी वसूल करण्याचे आव्हान कर संकलन विभागापुढे आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी १७ विभागीय कार्यालये आणि ऑनलाइनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ९१० कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. १ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कर संकलन विभागाच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, वर्तमान पत्रात नावे प्रसिद्ध करणे, नळ कनेक्शन खंडित करणे, जप्त मालमत्तांचा लिलाव करणे, यासारख्या कठोर कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळेच सातत्याने कराचा भरणा वाढला आहे.
नागरिकांना कर भरण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कर संकलन विभागाच्या वतीने विशेष खबरदारी घेतली जात आहे. उद्या शुक्रवारी गुड फ्रायडे आणि शनिवार, रविवार महापालिकेला शासकीय सुट्टी आहे. मात्र, या तिन्ही दिवशी नागरिकांच्या सोयीसाठी कर संकलन कार्यालये सकाळी साडेनऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत कॅश काऊंटरवर मालमत्ता कराचा भरणा स्विकारला जाणार आहे, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.
असा जमा झाला कर
ऑनलाइन – ५१३ कोटी ५८ लाख
रोख – १३१ कोटी २४ लाख
धनादेशाद्वारे – १४७ कोटी १७ लाख
इडीसी – १२ कोटी ९३ लाख
आरटीजीएस – ४३ कोटी २० लाख
डीडी – ८ काेटी १२ लाख
विविध ॲप – ६ कोटी ९३ लाख
इनइफ्टी – ६ काेटी ८३ लाख
कर भरणाऱ्या मालमत्तांची आकडेवारी
औद्योगिक – ४ हजार ३९५
निवासी – ४ लाख २६, ५३०
बिगरनिवासी – ४४ हजार ५५४
मिश्र – १२ हजार ४३२
मोकळ्या जमिन ४ हजार ४१६
इतर – ५
एकूण ४ लाख ९२ हजार ४२२
शहरातील निवासी मालमत्ता धारकांकडे माेठ्या प्रमाणात थकबाकी आहे. मात्र, ज्या थकबाकीदारांची आर्थिक क्षमता नाही, त्यांनी टप्या-टप्याने जेवढा शक्य आहे तेवढा कर भरावा. जेणेकरून विलंब शुल्काची रक्कम दिवसेंदिवस वाढणारी कमी हाेईल. थकीत कर भरणे हे नागरिकांच्याच फायद्याचे आहे – नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग