हिंदमाता भुयारी मार्गातील सांडपाणी व्यवस्थापन निविदेचा वाद पेटला
तळेगाव दाभाडे – येथील येथील हिंदमाता भुयारी मार्गामध्ये पावसाळ्याच्या काळात साठणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सुरू असलेल्या पाईपलाइनच्या कामासाठी बाजारभावाप्रमाणे 30 ते 35 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, या कामासाठी तब्बल 90 लाख रुपयांची निविदा सूचना काढण्यात आली असल्याचा आरोप आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. ही निविदा रद्द करून कमी खर्चाची फेरनिविदा सूचना काढून जनतेच्या पैशांची लूट थांबवावी, अशी सूचना देखील त्यांनी केली आहे.
तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना त्यांनी यासंदर्भात निवेदन पाठविले आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत हिंदमाता भुयारी मार्गामध्ये पावसाळ्याच्या काळात साठत असणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी चालू असलेल्या पाइपलाइनच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च वाढ होताना दिसत आहे. या काम हे 30 ते 35 लाखांत बाजार भावाने पूर्ण होत असताना देखील या कामाची निविदा 90 लाख रुपये काढण्यात आली आहे, असा आरोप आमदार शेळके यांनी केला आहे.
या कामाची माहिती घेतली असता जो पाईप या कामाअंतर्गत वापरला गेला आहे त्याचे बाजारभावाप्रमाणे मूल्य 9 ते 10 हजार रुपये असताना हेच पाईप 22 हजार रुपये दराने निविदेत दाखवले गेले आहे. याच कामामध्ये जेसीबी व पोकलेन उत्खननामध्ये 70 ते 80 रुपये घनमीटर बाजारात दर चालू असताना 150 ते 170 रुपये दर निविदेमध्ये निश्चित केला आहे, याकडे त्यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.
करोनामुळे आर्थिक संकट ओढावले असतानाच नगरपरिषदने केलेली करवाढ पाहता जनतेच्या पैशांचा होणारा अपव्यय टाळावा. हा मंजूर केलेल्या निविदेचा फेरविचार करून 90 लाखांचा अंदाजित खर्च असलेली निविदा 30 ते 35 लाख रुपयांची करावी, अशी सूचना आमदार शेळके यांनी मुख्याधिकाऱ्यांना केली आहे.