मुंबई : ठाकरे सरकारची मुघल राजशी तुलना करणारे आक्षेपार्ह वक्तव्य सोशल मीडिया युजरला चांगलेच महागात पडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समीर ठक्कर याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा जून आणि जुलै महिन्यात फोटो शेअर केला होता. यावेळी त्याने त्यांची तुलना मुघल राजशी केली होती. त्याने नितीन राऊत यांच्यावरही आक्षेपार्ह टीका केली होती.
या संबंधित सोशल मीडिया पोस्टबाबत तक्रार केल्यानंतर व्ही पी रोड पोलिसांनी समीर ठक्कर विरोधात बदनामीचा तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी समीर ठक्कर याला आपला जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहे.
दरम्यान, समीर ठक्कर याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका करत सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते.