शेवगाव – शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघ निवडणुक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 7 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता 9 उमेदवार या निवडणुकीसाठी स्पर्धेत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकाण यांनी दिली.
विधानसभा निवडणूक कार्यालयात केकाण तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनोद भामरे व नामदेव पाटील यांच्याकडे उमेदवारी मागे घेण्याचे अर्ज आले. त्यांनी दुपारी तीन नंतर अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. अपक्ष उमेदवारांना आज दुपारी चिन्हांचे वाटप करण्यात आले.
आज सोमवारी (दि. 7) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. कोण उमेदवारी अर्ज मागे घेतात, याकडे मतदार संघाचे तसेच निवडणुकीच्या रिंगणातील प्रमुख पक्षाच्या उमेदरांचे लक्ष लागलेले होते. उत्सुकतेपोटी काही सकाळी 11 वाजल्यापासून निवडणुक कार्यालयाच्या प्रांगणात लोक घिरटया घालत होते. उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्या हर्षदा विद्याधर काकडे, पाथर्डीचे भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अमोल अशोक गर्जे, किसन महादेव आव्हाड, प्रा. सुनिल मोहनराव पाखरे, निलेश बाबासाहेब ढाकणे, बाबासाहेब सुखदेव ढाकणे (सर्व अपक्ष ), तर ज्ञानेश्वर भास्कर जाधव (जय महाभारत पार्टी) यांचा समावेश आहे.
निवडणुकीच्या रिंगणात भाजपच्या आ. मोनिकाताई राजळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ऍड. प्रतापराव ढाकणे, वंचित बहुजन आघाडीचे किसन चव्हाण, राईट टु रिकॉल पार्टीचे धीरज बताडे, बसपाचे सुभाष साबळे तसेच विठ्ठल पांडुरंग वाघ, संदिप गोरक्षनाथ शेलार, सदाशिव सटवाजी शिंदे, कमरूद्दीन दगडू शेख ( सर्व अपक्ष ) असे 9 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.