ह्युस्टन – अमेरिकेत एका संगीताच्या कार्यक्रमाच्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये किमान 8 जण ठार झाले आहेत आणि अनेकजण जखमी झाले आहेत. टेक्सास प्रांतात ह्युस्टनमधील ऍस्ट्रोवर्ल्ड फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी रात्री ही दुर्घटना घडली. प्रेक्षक स्टेजजवळ जाण्याचा प्रयत्न करायला लागल्यामुळे ही दुर्घटना घडली. या कार्यक्रमाला ूब्बल 50 हजार प्रेक्षक उपस्थित होते. गर्दीमुळे प्रेक्षकांना दुसरीकडे जाण्याचा मार्गच न मिळाल्यामुळे अनेक जणांचा श्वास कोंडला गेला होता. शेकडो प्रेक्षक एकमेकांवर कोसळायला लागल्यामुळे हा कार्यक्रम ताबडतोब रद्द करायला लागला. ह्युस्टनच्या आपत्ती व्यवस्थापन विबागाने ट्विटवर याबाबतची माहिती दिली.
अमेरिकेतील रॅप गायक स्कॉट यांचा कार्यक्रम या वार्षिक उत्सवामध्ये होत असतो. करोनाच्या निर्बंदांनंतर प्रथमच असाप्रकारचा संगीताचा कार्यक्रम होत असल्यामुळे या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. प्रेक्षक हळूहळू स्टेजच्या दिशेने सरकायला लागल्यामुळे स्टेजजवळच्या प्रेक्षकांना हालचालींना जागाच उरली नाही. त्यातच काही जण खाली पडले आणि त्यांच्या अंगावर पाठिमागील प्रेक्षक कोसळले. यातच ही चेंगराचेंगरी झाली. यातच अनेकजणांची शुद्ध हरपली, असे ह्युस्टनच्या फायर डिपार्टनेंटच्या प्रमुखांनी सांगितले.
स्टेजच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नात अनेकजण पोर्टेबल टॉयलेटवरही चढले होते. सुरक्षा रक्षकांनी गर्दी कमी करण्याचा प्रयत्न सुरू केल्यावर लोकांना बाहेर पडण्याच्या नादात एकमेकांना पायदळी तुडवले. त्यामध्ये अनेकजण जखमी झाले. कार्यक्रमाच्या ठिकाणी उबारण्यात आलेल्या तात्पुरत्या रुग्णालयात 300 पेक्षा जास्त जणावर उपचार करण्यात आले. जखमींपैकी 11 जणांना हृद्यविकाराचा झटका आल्याचीही माहिती मिळते आहे.टेक्सासचे गव्हर्नर क्रेग ऍबॉट यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
घटनास्थळी नेमके काय घडले हे नेमके कोणीही सांगू शकत नव्हते. त्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांनी नागरिकांना नेमकी माहिती असल्यास ती कळवण्याचे आवाहन केले आहे. ही गर्दी इतकी प्रचंड होती की जखमींचा आणि कदाचित मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आयोजकांकडून व्यक्त होत आहे. ही चेंगराचेंगरी नेमकी कोणत्या कारणामुले झाली याचे कारण समजत नाही तोपर्यंत त्याबोबत काहीही बोलता येणार नाही, असे ह्युस्टनच्या पोलिसांनी म्हटले आहे.