फारूखाबाद – उत्तरप्रदेशातील फारूखाबाद जिल्हा कारागृहात एका कैद्याचा मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या कैद्यांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक करून हल्ला केला. त्यात सुमारे 30 पोलिस कर्मचारी जखमी झाले असून सहा कैदीही यात जखमी झाल्याचे वृत्त आहे.
या कारागृहातील एक कैदी डेंग्युमुळे आजारी पडला. त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तेथे त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला. हे वृत्त ऐकून कैदी संतप्त झाले आणि त्यांनी कारागृहातील सुरक्षा रक्षकांनाच लक्ष्य केले. कैद्यांनी तेथे जाळपोळही आरंभली. त्यामुळे अग्निशमन दलाला तिकडे पाचारण करावे लागले.
जखमी झालेल्यांमध्ये कारागृहाच्या उपजेलरचाही समावेश आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही जिल्हा दंडाधिकारी संजयकुमार सिंह यांनी दिली आहे.