कात्रज –धनकवडी येथील गणेश तानाजी भिंताडे आणि मुंबईमधील सूरज मालुसरे या गिर्यारोहकांनी कात्रज ते रायगड हा 77 कि.मी.चा ट्रेक 24 तासांत पूर्ण करून एक अनोखा विक्रम केला आहे. यापूर्वी हा ट्रेक कोणीही 24 तासांत पूर्ण केलेला नाही. साधारण 4000 मीटर एकूण इलेव्हेशन असलेल्या या ट्रेकमध्ये सिंहगड, राजगड, तोरणा आणि रायगड या चार किल्ल्यांबरोबरच कित्येक डोंगर चढून उतरावे लागतात आणि त्यामुळेच हा ट्रेक 24 तासांत पूर्ण करणे फार अवघड मानले जाते.
या मोहिमेत एकूण 19 जणांनी सहभाग घेतला होता, त्यातील फक्त 8 जण हा ट्रेक पूर्ण करू शकले. या मोहिमेसाठी 3 वेगवेगळ्या अभ्यास पूर्ण रेकी करून मोहिमेचा मार्ग निवडण्यात आला. संपूर्ण मार्गाचा टप्याप्रमाणे इलेव्हेशन आणि अंतर किती असेल, याची माहिती सहभागी सदस्यांना देण्यात आली होती. चालण्याचा आणि धावण्याचा योग्य सराव नसेल तर ही मोहीम होऊ शकत नाही. ट्रेल रनच्या एक महिना आधी सहभागी गिर्यारोहकांनी सरावाला सुरुवात केली.
…असा केला ट्रेक पूर्ण
शुक्रवार दि.25 फेब्रुवारी दुपारी 4:00 वाजता कात्रज जुना बोगद्याजवळील वाघजाई मंदिरापासून हा ट्रेक सुरू झाला आणि शनिवारी दि. 26 फेब्रुवारी दुपारी 4:00च्या आत हा ट्रेक सूरज आणि गणेश यांनी पूर्ण केला. तसेच, संजय शेळके आणि रुपेश तंवर यांनी हा ट्रेक 26 तास 30 मिनटांत पूर्ण केला. इतर सहभागी तरुणांनी हा ट्रेक 30 तास 30 मिनटांत पूर्ण केला. ज्येष्ठ गिर्यारोहक स्व. अरुण सावंत यांना मानवंदना म्हणून या मोहिमेची आखणी करण्यात आली होती.