धम्माल! यंदा शाळांना 76 दिवस सुट्ट्या

17 जूनपासून सुरू होणार शाळा :230 दिवस शाळा सुरू ठेवाव्या लागणार

पुणे – राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात एकूण 76 दिवस सुट्ट्या मिळणार असून 230 दिवस शाळेचे कामकाज सुरू ठेवावे लागणार आहे. विदर्भवगळता उर्वरित सर्व शाळा 17 जूनला शाळा सुरू कराव्या लागणार असून यादृष्टीने शालेय वार्षिक कामकाज व सुट्ट्यांमध्ये सुसूत्रता असावी, यासाठी शाळांना योग्य नियोजनाचा आराखडा तयार करावा लागणार आहे.

उन्हाळा आणि दिवाळीची सुट्टी याबाबत शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्‍चित करण्यात येते. जिल्ह्यांमधील सर्व मान्यताप्राप्त शासकीय व अशासकीय शाळांसाठी ही नियमावली लागू आहे. दि.1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करुन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी नियोजन करुन उन्हाळी सुट्टी जाहीर करावी लागणार आहे. विदर्भ विभागातील शाळा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर 26 जूनला सुरू होणार आहेत.

शाळांना उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी कमी करुन त्याऐवजी गणेशोत्सव, नाताळ यासारख्या सणांसाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने सुट्ट्या घेता येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी निश्‍चित केलेल्या स्थानिक सुट्ट्या व शासन स्तरावरुन जाहीर करण्यात आलेल्या सर्व सार्वजनिक सुट्ट्या शाळांनी घेणे बंधनकारक आहे. धार्मिक सण व उत्सवाच्या कालावधीत परीक्षा घेणे व सुट्ट्यांचे नियोजन करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जून ते मे असे शैक्षणिक वर्ष विचारात घेऊन संबंधित शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनांची बैठक घेऊन सुट्ट्या निश्‍चित करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. प्रयोग शाळा सहायक व प्रयोगशाळा परिचर हे कर्मचारी वगळून इतर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दीर्घ सुट्ट्या देता येणार नाहीत. मात्र दीर्घ सुट्ट्यांच्या कालावधीतील सार्वजनिक सुट्ट्या त्यांना द्याव्या लागणार आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी आपआपल्या स्तरावरुन शाळांना सुट्ट्यांबाबतचे आदेश द्यावेत. नियमांपेक्षा जास्तीच्या सुट्ट्या कोणत्याही शाळांना देऊ नयेत, अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.