उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद; आज होणार मतमोजणी
नगर : पंधरा दिवसांच्या राजकीय रणधुमाळीनंतर जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व 13 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी रविवारी (दि.5) उत्साहात मतदान झाले. सकाळपासून दमदार मतदानाला सुरुवात झाली. सरपंच पदाच्या 178 जागेसाठी 610 उमेदवार रिंगणात आहे. ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या 1 हजार 701 जागांसाठी 3 हजार 995 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतदारांमध्ये सकाळपासून मतदानासाठी उत्साह होता. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत 67. 16 टक्के मतदान झाले. त्यानंतरही मतदानाचा ओघ कायम राहिला. जिल्ह्यात सरासरी 71 टक्के मतदान झाले. सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे. सोमवारी (दि.6) मतमोजणी होणार आहे.
जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. सरपंच पदाच्या 194 जागांसाठी 1 हजार 311 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीनंतर 610 उमेदवार रिंगणात आहे. ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या 1 हजार 701 जागांसाठी माघारीनंतर प्रत्यक्षात 3 हजार 995 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. यापैकी 16 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित 178 ग्रामपंचायतींसाठी 1 हजार 93 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.
साडे चार हजार अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. निवडणूक कर्मचारी हे मतदान केंद्रांवर रात्रीच मुक्कामी पोहचले होते. सकाळी साडे सात वाजताच मतदानाला प्रारंभ झाला. उमेदवार, त्यांचे कुटुंबीयांनी प्रारंभीच मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ही मतदार आपल्या सोईनुसार मतदानासाठी येत होते. नोकरी, कामधंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेले मतदार दुपारपासून मतदानासाठी येण्यास प्रारंभ झाला. जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतींमधील 2 लाख 95 हजार 252 मतदारांनी दुपारी साडे तीन वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला होता. जिल्ह्यात सरासरी 67. 16 टक्के मतदान झाले होते.
तालुकानिहाय ग्रामपंचायतींचा संख्या, दुपारी साडे तीन वाजेपर्यंत झालेले मतदानः अकोले -21 (14 हजार 206) 70.13, संगमनेर – 6 (11 हजार 952) 57.14. कोपरगाव-17 (30 हजार 488) 65.31. श्रीरामपूर -13 (24 हजार 241) 56.83, राहाता- 12 (31 हजार 4) 59.76, राहुरी- 21 (36 हजार 561) 66.27, नेवासे -16 (28 हजार 935) 78.04, नगर -6 (13 हजार 665) 71.04, पारनेर – 7 (10 हजार 593) 70.78, पाथर्डी – 14 (15 हजार 768) 72.55, शेवगाव – 27 (40 हजार 413) 71.70, कर्जत- 6 (7 हजार 818) 79.21, जामखेड- 3 (4 हजार 823) 73.13, श्रीगोंदे – 9 (24 हजार 785) 68.38.
केंद्रातच तरुणाला हृदयविकाराचा झटका
पाथर्डी तालक्यातील करंजी ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरु असतांना सुनिल गांधी हे मतदानासाठी आले. मतदान करुन ते मतदान कक्षाच्या बाहेर आले. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामुळे मतदान केंद्रावर धावपळ उडाली. त्यांना तातडीने रुग्णालायत नेण्यात आले. सुनील गांधी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. परंतु गावातील मतदान असल्यामुळे ते मतदानासाठी आले. मतदान करेपर्यंत त्यांना काहीच त्रास झाला नाही. मतदान करुन आल्यानंतर त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. परंतु उपचार सुरु करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
पंधराशे पोलिसांचा मोठा बंदोबस्त
ग्रामपंचायत मतदानासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा उपअधीक्षक या मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेऊन होते.कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली गेली. सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाचे 91 अधिकारी बंदोबस्तात होते. समवेत 982 पुरुष व 178 महिला अंमलदार पोलीस बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या मदतीला 175 होमगार्ड तसेच एक आरसीपी प्लाटून, एक क्यूआरटी प्लाटून, एक एसआरपीएफ प्लाटून बंदोबस्त होता.
13 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक
जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक आहे. 8 हजार 926 मतदार असून एक सरपंचपदासह 12 सदस्यांची निवड करणार आहेत. अकोले 4, कर्जत 2 तर संगमनेर, श्रीरामपूर, पारनेर, नेवासे, शेवगाव, श्रीगोंदे प्रत्येकी एका ग्रामपंचायतीच्या सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. राहाता तालुक्यात एका ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी 3 मतदान केंद्र होते.