पिंपरी – सहा महिन्यांपूर्वी स्थगित केलेला आंतरजिल्हा बदलीचा सहाव्वा टप्पा पुन्हा राबविण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रालयातील बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे ज्यांनी अर्ज केले त्यांना ऑनलाईन फॉर्म एडीट करता येणार आहे. शिवाय, ज्यांनी अर्ज केला नाही, अशा बदलीपात्र सर्व शिक्षकांना अर्ज करता येणार आहेत. तसा आदेश राज्याचे उपसचिव तुषार महाजन यांनी शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहेत.
राज्यातील शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद येथे बैठक घेण्यात आली. त्यामध्ये विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्या मागणीनुसार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे धोरण राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. अंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सहाव्वा टप्पा यापूर्वीच राबविण्यात येणार होता. मात्र, शाळा सुरु झाल्यामुळे शालेय कारणांपोटी त्याला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे 2022 रोजी अर्ज केलेल्या शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या नव्हत्या. मात्र, आता आंतरजिल्हा बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार 2022 मध्ये शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीस केलेला ऑनलाईन अर्ज एडीट करता येणार आहे. शिवाय, अर्ज न भरलेल्या बदलीपात्र सर्व शिक्षकांना अर्ज करण्याचाही पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसे आदेश राज्याचे उपसचिव तुषार महाजन यांनी शिक्षण आयुक्तांना दिले आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी स्थगिती दिलेली अंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रियेच्या सहाव्या टप्प्याला सुरुवात करण्यात येत आहे.
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण सचिव रणजीत सिंह देओल, उपसचिव तुषार महाजन यांच्यासमवेत प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शुक्रवारी (दि. 3) बैठक झाली. त्यामध्ये शिक्षक संघटनेच्या वतीने आम्ही केलेल्या मागणीचा विचार करुन आंतरजिल्हा बदलीचा सहाव्वा टप्पा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
– मनोज मराठे,राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख संघटना