सलग तिसऱ्या दिवशी निर्देशांकांत घट

वित्त व बॅंकिंग कंपन्यांच्या शेअरची नफ्यांसाठी विक्री

मुंबई – निर्देशांक उच्च पातळीवर आहेत. कंपन्यांचे ताळेबंद संमिश्र स्वरूपात जाहीर होत आहेत. त्याचबरोबर भारतात निवडणुका चालू आहेत. असे असतानाच अमेरिकेने इराणवरील निर्बंध अधिक कडक केल्यामुळे भारतीय शेअरबाजारात विक्रीचे वारे होते. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी शेअरबाजार निर्देशांकांत घट झाली.

मंगळवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 80 अंकांनी कमी होऊन 38,564 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 18 अंकांनी कमी होऊन 11,575 अंकांवर बंद झाला.
आता गुंतवणूकदारांचे लक्ष निवडणुकातील घडामोडी आणि कंपन्यांच्या ताळेबंदाकडे राहणार आहे. मंगळवारी वित्तीय कंपन्या आणि वाहन क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री करून गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला. सेन्सेक्‍ससंदर्भातील 30 पैकी 20 कंपन्यांचे शेअर घसरले तर दहा कंपन्यांचे शेअर वधारले.

दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांनाही विक्रीचा फटका बसला. याबाबत बोलताना जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, अमेरिकेच्या इराणवरील निर्बंधचा भारतावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे क्रुडचे दर वाढले आहेत, याचा शेअरबाजारातही परिणाम होत असल्याचे दिसून आले.

मंगळवारी क्रुडचे भाव 0.62 टक्‍क्‍यांनी वाढून 74.50 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेले. सोमवारी झालेल्या व्यवहाराच्या माहितीनुसार सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 267 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. तर देशातील संस्था गुंतवणूकदारांनी 198 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. मंगळवारी रुपयाचे मूल्य मात्र पाच पैशांनी वाढूून 69.62 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेले.

येस बॅंकेचा शेअर आज सर्वात जास्त म्हणजे 2.33 टक्‍क्‍यांनी कोसळला. त्याचबरोबर इंडसइंड बॅंक, स्टेट बॅंक आणि एचडीएफसी बॅंकेच्या शेअरच्या भावातही घट झाली. या पडत्या काळातही सन फार्मा, कोल इंडीया, आयटीसीचे शेअर वधारले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.