पुणे – शहरात वाटमारी आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या चोरट्यांचा फटका भल्याभल्यांना बसत आहे. याचाच प्रत्यय नुकताच एका नामांकित न्यूज चॅनेलला आला.
संबंधित न्यूज चॅनेलच्या कारचालकाचे लक्ष विचलित करून कॅमेऱ्यासह 7 लाख 10 हजारांचा ऐवज चोरण्यात आला. ही घटना फर्गसन महाविद्यालय रस्त्यावर घडली.
याप्रकरणी किरण कांबळे (29, रा. दत्तवाडी) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे संबंधित न्यूज चॅनेलच्या गाडीवर चालक म्हणून करारावर कामास आहेत. ते कार्यालयाची गाडी घेऊन चॅम्पियन स्पोर्टससमोर पार्क करून थांबले होते. ते गाडीत बसले असताना दोन व्यक्ती तेथे आल्या. त्यातील एकाने फिर्यादीस खुणावत “ओ देखो रस्तेपर क्या गिरा है’ असे म्हटले. यामुळे फिर्यादी रस्त्यावर पडलेले पैसे उचलायला गेले. इतक्यात दुसऱ्या व्यक्तीने संधी साधत गाडीतील काळ्या रंगाच्या बॅगमधील एक कॅमेरा, इतर साहित्य, वाहन परवाना, एटीएमकार्ड आणि आयकार्ड असा 7 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.