आजपासून तक्रार प्रणालीची अंमलबजावणी
पुणे – दैनंदिन कामकाज तसेच समस्यांबाबत केल्या जाणाऱ्या नागरी तक्रारींची जबाबदारी आता थेट संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर असणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने पीएमपी ऑफिसर कनेक्ट हे नवीन मोबाइल ऍप विकसित केले आहे.
कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी हे ऍप असणार आहे. या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आपल्या कामकाज, वेतन, शासनाचे आदेश, पगार पावती तसेच कर्मचाऱ्यांशी संबंधित सर्व माहिती असणार आहे. नागरिकांकडून पीएमसी केअर तसेच इतर ऑनलाइन प्रणालीवर आपल्या तक्रारी केल्या जातात. या तक्रारी ऍपवरून संबंधित विभागाकडे पाठवण्यात येतात.
मात्र, अधिकाऱ्यांकडून या तक्रारींचे निराकरण न करता त्या आपल्या खात्यात नेमलेल्या नोडल ऑफिसरकडूनच निकाली काढल्या जातात. त्यामुळे अनेकदा प्रशासनाला टीकेचे धनी व्हावे लागते. अशा प्रकारांना कोणालाही जबाबदार धरता येत नाही. त्यामुळे संबंधित जबाबदारी निश्चित करण्यासह कामात सुसूत्रता आणण्यासाठी पीएमपी ऑफिसर कनेक्ट हे ऍप विकसित केले आहे.
त्यात आता नागरिकांच्या तक्रारी थेट संबंधित विभाग प्रमुखांनाच दिसणार असून त्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली आणि झाल्यास ती बंद करण्याचे अधिकार विभाग प्रमुखानांच असणार आहेत. या ऍपची अंमलबजावणी करणे सर्व अधिकाऱ्यांना बंधनकारक केले असून 1 मार्चपासून ते सुरू केल्याचे माहिती व तंत्रज्ञान विभागाने सांगितले.