रेडा ( नीलकंठ मोहिते/ प्रतिनिधी ) इंदापूर तालुक्यात वाढत असलेल्या कोरोनाबधितांची आकडेवारी पाहता, इंदापूर तालुका व इंदापूर नगरपरिषद कार्यक्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्रात म्हणजेच संपूर्ण तालुक्यात सोमवारी रात्री 1 वाजल्यापासून सात दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश सोमवार ( दि.9) रोजी प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिले आहेत.
सोमवार (दि.9 मे ) मध्यरात्री पासून ते सोमवार (दि.17) मे पर्यंत संपूर्ण तालुक्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रातील 65 वर्षावरील सर्व व्यक्ती, अति जोखमीचे जसे मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, यकृत व मुत्रपिंडाचे आजार, कर्करोग, एचआयव्ही बाधित रुग्ण असलेल्या व्यक्ती गरोदर महिला, वय वर्षे 10 पेक्षा कमी वयोगाटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर जाता येणार नाही. तसेच इतर कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय घरा बाहेर पडता येणार नाही.
तसेच सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, व सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने सात दिवस संपुर्णत: बंद राहतील. केवळ अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोहच सेवेसाठी सुरु राहतील. सार्वजनिक, खाजगी क्रिडांगणे, मोकळया जागा, उदयाने, बगीचे हे संपूर्णतः बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग वोक प्रतिबंधीत राहील.
उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स (वंदे भारत योजने अंतर्गत कोविड 19 करिता वापरात असलेले वगळुन) रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट संपुर्णत: बंद राहतील. सर्व केश कर्तनालय, सलुन, स्पा, ब्यूटी पार्लर इत्यादी दुकाने संपुर्णत: बंद राहतील. सर्व किरकोळ व ठोक विक्रोचे ठिकाणे मोंढा,आडत भाजी मार्केट, फळे विक्रेते, आठवडी व दैनिक बाजार, फेरीवाले, मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादीची सर्व दुकाने संपुर्णतः बंद राहतील.
शाळा, महाविदयालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपुर्णतः बंद राहतील. तथापि ऑनलाईन एजूकेशन ला प्रतिबंध राहणार नाही. सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी, संपुर्णत: बंद राहतील.
प्रतिबंधित क्षेत्रातील सार्वजनिक व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर, इत्यादीसाठी संपूर्णत: बंद राहतील. तथापी कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे इंदापूर तालुक्यातील व इंदापूर नगरपरिषद क्षेत्रातील पोलीस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागांचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी व वाहनांना सदरच्या आदेशानुसार वगळण्यात येत आहे. तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तु यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतुक सदरच्या आदेशातून वगळण्यात येत आहे.
इंदापुर तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील अत्यावश्यक सेवा मधील मेडीकल व दवाखाने वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने, शॉपिंग मॉल्स व तत्सम गर्दी होण्याची ठिकाणे दि. 11 मे 2021 रोजी पासुन ते दि. 17 मे 2021 रोजी पर्यंत संपुर्णतः बंद राहतील.
खालील सेवा सुरू राहणार मात्र निर्बंध पाळून
दूध विक्री व घरपोच दुधाचे वितरण सकाळी 7 ते 9 वेळेत घरपोहोच सुरु राहील. सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकिय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील, सर्व रुग्णालये व रुग्णालयाशी निगडीत सेवा आस्थापना त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील व कोणतेही रुग्णालय प्रतिबंधित क्षेत्राच्या आदेशाचा आधार घेवुन रुग्णांना आवश्यक सेवा नाकारणार नाही, अन्यथा संबंधित रुग्णसेवा संस्था कारवाईस पात्र राहील. सर्व मेडीकल दुकाने व दवाखाने तसेच ऑन लाईन औषध वितरण सेवा २४ तास कालावधी करीता सुरू राहतील. पेट्रोलपंप व गॅसपंप सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत सुरु राहतील व ते केवळ शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहनास इंधन पुरवठा करतील. एलपीजी गॅस सेवा घरपोच गॅस वितरण नियमानुसार राहील. निर्यात होणान्या वस्तूंची वाहतूक शासन नियमानुसार सुरु राहील.
दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके, यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल, प्रिंटमिडिया यांची कार्यालये शासकीय नियमानुसार सुरु राहतील. वर्तमानपत्रे वितरण सकाळी 6 ते 9 या वेळेमध्येच अनुज्ञेय राहील.पाणीपुरवठा करणारे टँकरला नियमानुसार परवानगी राहिल.
इंदापूर तालुक्यात कानाकोपऱ्यात पोलीस तैनात
इंदापूर शहरात 4 अधिकारी, 7 महिला कर्मचारी, 40 पोलीस कॉन्स्टेबल व 40 होमगार्ड असा तगडा बंदोबस्त इंदापूर शहरात असणार आहे. तालुक्यातील निमगाव केतकी, बावडा, वालचंदनगर, भिगवण व ग्रामीण भागात वेगळा असा तालुक्यातील कानाकोपऱ्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पोलिसांचा असणार आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलीस हवालदार गणेश झरेकर यांनी सांगितले.
नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे
इंदापूर तालुक्यातील नागरीकांच्या आरोग्यसाठीच हा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, तसे केल्यास पोलीस प्रशासन त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून, कोरोनावर मात करण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन तहसिलदार अनिल ठोंबरे यांनी केले आहे.