इंदापूर, (प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील महिन्यात आपल्या पक्षाचा मेळावा घेत,वेगळी ऊर्जा आपल्या गटातील कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी यांना दिली. तर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,अचानकच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना आदेश देऊन, अजित पवार गटाशी मनोमिलन करण्याचा निर्णय आपली राजकीय नीती वापरत यशस्वी केला.
त्यामुळे सद्यस्थितीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभेच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांचे कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागल्याचे चित्र आहे. राजकारणात कोण कोणाचा शत्रू आणि मित्र कायमस्वरूपी नसते. याचा प्रत्यय इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच आलेला दिसतो. अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे राजकारणातील विळयां भोपळ्याचे नाते.
त्यातच अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर विरोधक, मात्र नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे अभिवचन नुकत्याच झालेल्या भाजपच्या मेळाव्यात दिल्याने इंदापुरातील राजकीय कडवटपणा दूर होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
इंदापूर तालुक्यात अजित पवार गटाचे सध्याला दोन आमदार आहेत.त्यामध्ये आमदार दत्तात्रय भरणे व मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंतराव माने यांनी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्या क्रमांकाचे लीड देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी बैठका,घोंगडी बैठका,नव्या जुन्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन यावर मोठा भर दिलेला दिसतो. या दोन्हीही आमदारांच्या दौऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी मतदारांनी दिलेला आहे
त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर असणारे माजी सभापती व पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण माने यांनी रविवार (ता.७ एप्रिल) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन, सुनेत्रा पवार यांचा प्रचार ताकतीने करणार, असे जाहीर केले. त्यामुळे मोठा कोणताही विरोधक सुनेत्रा पवार यांच्या विरोधात सद्यस्थितीला इंदापुरात दिसत नाही. तालुक्यातील सर्वच मातब्बर सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
” श्रीराज भरणे युवा मतदारांच्या गराड्यात “
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते श्रीराज भरणे मागील काही वर्षापासून तालुक्यातील प्रत्येक गावातील युवकांच्या संपर्कात आहेत. नव्या मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका गळी उतरवण्याचे काम करत असून,छोटी मोठी कामे,युवा वर्गाची श्रीराज भरणे मार्गी लावत असल्याने,युवक मतदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडेे वळाला आहे.
१)आमदार दत्तात्रय भरणे,
२)आमदार यशवंत माने,
३)माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,
४)प्रवीण माने.