सातारा – सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा मेडिकल कॉलेजसाठी वाढीव 60 एकर जागेच्या हस्तांतरणासाठी 61 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना यश आले आहे. राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय अधिवेशनात आ. शिवेंद्रराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मेडिकल कॉलेजसाठी वाढीव जागेच्या हस्तांतरणाचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. या मागणीवरुन ना. पवार यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या जागेच्या हस्तांतरणाचा व त्यासाठी 61 कोटी रुपये निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर साताऱ्यातील विकासकामांसाठी आ. शिवेंद्रराजे यांनी पाठपुरावा सुरु केला होता. विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय अधिवेशनात त्यांनी पालकमंत्री पाटील यांच्यासमवेत ना. अजित पवार यांची भेट घेऊन मेडिकल कॉलेजबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. त्यावर ना. पवार यांनी ना. पाटील व आ. शिवेंद्रराजेंच्या उपस्थितीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
कृष्णा खोरे विभागाची कृष्णानगर येथील 25 एकर जागा मेडिकल कॉलेजसाठी यापूर्वी अधिग्रहीत करण्यात आली आहे. उर्वरित 60 एकर जागा हस्तांतरीत करण्याचा निर्णय प्रलंबित होता. ही जागा तातडीने हस्तांतरित करण्यासाठी प्रशासकीय बाबी पूर्ण कराव्यात, कॉलेज उभारणीसासाठी तातडीने निधीची तरतूद करावी आणि कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू व्हावी, अशी मागणी आ. शिवेंद्रराजे यांनी केली. त्यावर, मेडीकल कॉलेजसाठी वाढीव 60 एकर जागा तातडीने हस्तांतरित करण्याचा आदेश ना. पवार यांनी दिला.
त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून 61 कोटी रुपयांची तरतूद ना. पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे. हे मेडिकल कॉलेज नाशिक विद्यापीठाशी संलग्न करण्याचा निर्णय झाला आहे. नॅशनल मेडिकल कमिशनमार्फत येत्या 15 दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करण्यात येऊन पुढील कार्यवाही होणार आहे. सातारा जिल्ह्याचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ. शिवेंद्रराजे यांनी ना. अजित पवार व ना. बाळासाहेब पाटील यांचे आभार मानले.